Pune : भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी २५ लाख अनुयायी येणार

एमपीसी न्यूज – सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मंगळवारी (दि. १ जानेवारी २०२०) मौजे पेरणे येथील भिमा कोरेगाव विजयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी राज्य व देशभरातून सुमारे २५ लाख आंबेडकर अनुयायी येणार असून त्यांच्या स्वागताची व पायाभूत सुविधाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यावर्षी मागील वर्षाप्रमाणेच कोणतीही अनुचित घटना न घडता सामाजिक सौहार्द राखले जाण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती भिमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य दिन समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.

यावेळी काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड उपस्थित होते. सोमवारी दुपारी एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भिमा कोरेगाव लढयामध्ये सन १८१८ साली अद्वितीय शौर्य गाजवून पेशवाईचा पराभव करणाऱ्या शूरवीर महार योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो वर्षापासून या ठिकाणी अभिवादन केले जाते. सन १९२७ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या स्मारकाला आपल्या सहयोगी अनुयायां समवेत भेट दिल्यानंतर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. यंदाच्या वर्षीही ही संख्या तब्बल २५ लाखापर्यंत जाण्याचे अनुमान नागपूर दिक्षाभूमी व मुंबई चैत्यभूमी येथे धम्मदिक्षा व महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात सहभागी लोकांशी केलल्या चर्चेच्या अनुमानातून जाणवत आहे.

या शौर्यदिन महोत्सवासाठी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने सुमारे ६ महिन्यांपासून तयारी करण्यात येत आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मिळवून घेण्यासाठी पाठपुरावा केला जातो. मागील वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, पार्किंग, लाईट, सूचनांसाठी स्पीकर, अॅम्बुलन्स, प्राथमिक आरोग्य केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, पीएमपीएमएल बसेस व एसटी महामंडळाच्या बसेस आदींसह सुमारे ९ ते १० हजार पोलिसांचा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.

तर दि. 30 व 31 रोजी येणाऱ्या अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असून सुमारे एक लाख नागरिकांना जेवण देण्यात येणार आहे. दरम्यान, भिमा कोरेगाव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी समिती तसेच रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून याची दखल घेत प्रधानमंत्री कार्यालयाने सदर स्मारकासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश संरक्षण मंत्रालय, सांस्कृतिक कार्य मंत्रालय, तसेच भारतीय पुरतत्व विभाग यांना दिलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.