Bhosari : पाच जणांकडून 12 दुचाकी जप्त; 11 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी दोन कारवायांमध्ये पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण चार लाख 65 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सहा पोलीस ठाण्यातील अकरा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

गौरव बळीराम शेवाळे (वय 25), कुणाल महेंद्र आकलाडे (वय 20), किरण गुरुनाथ राठोड (वय 21, तिघे रा. भोसरी), पंकज म्हातारभाऊ वाळुंज (वय 19, रा. पाबळ रोड खेड), चेतन रामदास कोळेकर (वय 23, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी सागर भोसले आणि आशिष गोपी यांना मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांनी आरोपी गौरव, कुणाल आणि किरण या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे सहा गुन्हे गुन्हे उघडकीस आले.

दुस-या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी सुमित देवकर आणि समीर रासकर याना माहिती मिळाली की, भोसरी येथील एका महाविद्यालयात शिकणारा तरुण त्याच्या साथीदारादारासोबत मिळून दुचाकी वाहने चोरी करत आहे. तो आता पोलिसांच्या कारवाईला घाबरला असून त्याने चोरलेल्या दुचाकी जिथून चोरल्या आहेत, त्या ठिकाणी आणून लावणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पंकज आणि चेतन या दोघांना अटक केली. दोघांकडून तीन लाख पाच हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त केल्या असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 12 दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार, पिंपरी, चिंचवड मधील प्रत्येकी दोन, एमआयडीसी भोसरी, विश्रांतवाडी, खेड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. एम एच 12 / पी डब्ल्यू 0604 आणि एम एच 12 / जे जे 8715 या दोन दुचाकींच्या मालकांचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, संदीप जोशी, आशिष गोपी, सागर जाधव, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.