Bhosari : भोसरीमध्ये विद्यार्थी साकारणार 500 किल्ल्यांच्या प्रतिकृती; आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज – महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने 500 गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचा जागतिक विक्रमाचा उपक्रम होणार आहे. इयत्ता तिसरी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थी हे किल्ले साकारणार आहेत. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी असलेल्या गावजत्रा मैदानावर हा कार्यक्रम रविवारी (दि. 5) आणि सोमवारी (दि. 6) होणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, कार्यक्रमाचे समन्वयक अजित सस्ते, नितीन मोरे, मनोज काळे, माधव कुलकर्णी, संदीप मोरे, आनंद फुले, सई तिकोने आदी उपस्थित होते. श्री गुरुपीठाद्वारे या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची नोंद विश्वविक्रमात करण्यात येणार आहे. उपक्रमात मोफत सहभाग घेता येणार आहे. आतापर्यंत 497 बालसंस्कार वर्ग व युवा वर्ग संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये दुबई, व्हिएतनाम आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघाचा समावेश आले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “उपक्रमाचे उद्‌घाटन रविवारी सकाळी नऊ वाजता महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित राहणार आहेत. उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत किल्ले बनविण्याचा उपक्रम होईल. दुपारी एक ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि दुस-या दिवशी (सोमवारी) सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिवप्रेमींसाठी किल्ले पाहण्यासाठी खुले राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची व गडकोट किल्ल्यांची माहिती व्हावी. तसेच या गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने विश्वविक्रमी ‘किल्ले बनवा’ हा जागतिक विक्रमाचा उपक्रम व राज्यस्तरीय ‘युवा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितिन मोरे यांचे व्याख्यान या कार्यक्रमात होणार आहे.

उभारण्यात येणार किल्ल्याची भौगोलिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शवणारे पोस्टर त्याठिकाणी असणार आहेत. यामुळे नागरिकांना किल्ले पाहताना त्याचा इतिहास देखील समजून घेता येणार आहे. विद्यार्थी मातीचे गड-किल्ले साकारताना किल्ल्यांचे प्रकार, वैशिष्ट्य व वेगळेपण, तसेच गडकिल्ल्यांवर असणारे विविध अवशेष याबाबत सर्व माहिती शिवप्रेमींना होणार आहे. या उपक्रमासाठी विभागाच्या विशेष पथकाकडून किल्ले बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातून उभारले जाणारे हे गड-किल्ले म्हणजे एक प्रकारे इतिहासाचा प्रत्यक्ष जागरच आहे. गड-किल्ल्यांवर जातांना फक्त पर्यटन म्हणून न जाता प्रत्यक्ष इतिहासाला भेट देत आहोत, ही भावना विद्यार्थी व युवकांमध्ये यावी, तसेच पर्यावरण पूरक पर्यटन असावे. कचरा न करता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याला कसे जपता येईल याचेही मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे हजारो विद्यार्थी व युवकांना करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, बीड, परभणी, यासह विविध जिल्ह्यातून युवक येणार असल्याचेही लांडगे म्हणाले.

सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितिन मोरे म्हणाले की, किल्ले बनविण्याच्या उपक्रमात संस्थेच्या वतीने सुरु असणा-या सुमारे 500 बालसंस्कार व युवा प्रबोधन वर्ग तसेच परिसरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. या माध्यमातून एकाच दिवशी, एकाच वेळी तब्बल 500 पेक्षा अधिक मातीचे गड-किल्ले बनवून त्याद्वारे छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांची व महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा प्रयत्न होणार आहे. पुणे जिल्हा हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. तसेच जिल्ह्यातील विविध किल्ले देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्व आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.