Bhosari : उरलेले जेवण घेण्यासाठी गेली अन चिमुरडी जीव गमावून बसली

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर भंगार गोळा करीत असलेल्या आठ वर्षीय मुलीला धडक दिली. दररोज उरलेले जेवण देण्यासाठी आलेल्या टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने या चिमुरडीचा जीव घेतला. ही घटना सोमवारी (दि. 23) कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्राजवळ घडली.

रोशनी सुरेश जगताप (वय 8, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई अंजु सुरेश जगताप यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी सोमवारी तिच्या आई-वडिलांसह भंगार गोळा करीत होती. त्यावेळी त्यांना दररोज उरलेले जेवण देण्यासाठी एक टेम्पो येत असे. हा टेम्पो सोमवारी आला. टेम्पो चालकाने हॉर्न वाजवून मुलीला बोलावले. टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. यामध्ये तिच्या कपाळाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी तिला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रोशनीची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.