Bhosari Crime News : एक कॉल आला अन पोलिसांची धावपळ उडाली; खोदला खड्डा, निघाले मांजर

मानवी मृतदेह पुरल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी खोदकाम केले असता मांजराचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज – पांजरपोळ येथे रात्रीच्या अंधारात एक मानवी मृतदेह पुरल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. रविवारी सुट्टीच्या दिवशी भोसरी परिसरातील सर्व पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी पांजरपोळ परिसरात ठाण मांडून बसले. माहिती मिळालेल्या ठिकाणी खोदकाम केले असता तिथे चक्क मांजराचा मृतदेह आढळून आला.
रविवारी (दि. 28) दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला. ”साहेब मी पांजरापोळ, भोसरी येथून बोलतोय. आमच्या इथं रात्रीच्या अंधारात कोणीतरी मृतदेह पुरला आहे. तुम्ही लवकर या” अशी माहिती त्या व्यक्तीने पोलिसांना दिली. घटना गंभीर असल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली.
भोसरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी पोलिसांना एका ठिकाणी जमीन खोदलेली दिसली. जमीन खोदलेल्या जागेवर हळदी, कुंकू, गुलाल टाकला होता. तसेच अगरबत्ती लावली होती. या एकंदरीत परिस्थितीवरून त्या ठिकाणी मानवी मृतदेह असल्याची शक्यता पोलिसांना देखील आली.
जमीन उकरून मृतदेह बाहेर काढायचा असल्यास पंच म्हणून तहसिलदार, शासकीय कर्मचारी असणे आवश्यक असते. रविवारी सुट्टीच्या दिवशी भोसरी पोलिसांनी या शासकीय अधिकाऱ्यांची जमवाजमव केली आणि खड्डा उकरण्यास सुरुवात केली. खड्डा खोदत असताना आसपासच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.
पोलिसांनी काही फूट खोल खोदले असता त्यांच्या हाती एका मांजराचा मृतदेह लागला. मांजर हाती लागले असल्याने पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार नसल्याची खात्री करून सुटकेचा नि:श्वास सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.