Bhosari : खोट्या नोटा बँकेत जमा करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लाखो रुपये बँकेत जमा करत असताना त्यामध्ये काही खोट्या नोटा मिसळून जमा करत असताना एकजण मिळून आला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कासारवाडी शाखेत घडली आहे.

बँकेचे मुख्य व्यवस्थापक सुरजितकुमार सत्‍यनारायण साह (वय 42) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील बाळकृष्ण तेलंग (वय 43, रा. सुदर्शन नगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील तेलंग हा मंगळवारी (दि. 28) दुपारी सव्वा एकच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कासारवाडी शाखेत पैसे जमा करण्यासाठी आला. त्याने बँकेत 4 लाख 93 हजार 855 रुपये जमा केले.

हे पैसे जमा करत असताना 500 रुपये किमतीच्या 11 नोटा खोट्या असल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे खोट्या नोटा स्वतःजवळ बाळगून त्या व्यवहारात वापरल्याप्रकरणी तेलंग याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला समजपत्र देऊन सोडले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.