Bhosari: सहकारी बांधवाना दिला मदतीचा हात; ‘पीएमपी’च्या भोसरी आगारचा स्तुत्य उपक्रम

Bhosari: A helping hand given to fellow colleague; Commendable project of PMPml's Bhosari depot

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएलने लॉकडाउनमुळे प्रवाशांची वाहतूक सुविधा बंद केल्याने रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांना काम मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना दरमहा मासिक वेतन न मिळाल्याने या कामगारांची व कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा होत आहे. हे लक्षात घेऊन पीएमपी’च्या भोसरी आगाराने गुरुवारी स्तुत्य उपक्रम राबविला. येथील कायम कर्मचाऱ्यांकडून बदली कामगारांना जीवनावश्यक साहित्य पुरवत मदतीचा हात दिला आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाल्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत.

मात्र मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रवाशांची वाहतूक सुविधा बंद करण्यात आल्यामुळे ‘पीएमपी’ महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या. महामंडळाचे उत्पन्न घटल्याने फक्त कायम कर्मचाऱ्यांनाच रोटेशन पध्दतीने कामावर बोलावण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना भोसरी आगाराचे आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे म्हणाले लॉकडाऊनमुळे अतिशय बिकट परिस्थिती भोसरी आगारातही निर्माण झाली.

भोसरी आगारामध्ये चालक व वाहक, झाडूवाला, क्लिनर असे एकूण 92 बदली कर्मचारी हजेरीपटावर आहेत. यांना वेतन मिळालेले नाही.

ही सर्व परिस्थिती विचारात घेता सामाजिक बांधिलकी म्हणून कायम कर्मचाऱ्यांकडून बदली कामगारांना अल्प स्वरूपात काही मदत देण्याचा उद्देश ठेवून भोसरी आगारातील कायम कर्मचा-यांनी खेच्छेने एकत्र येउन निधी जमा केला आहे.

या निधीमधून रोजंदारी कर्मचा-यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट व सॅनिटायझर, फेसमास्क व फेस शिल्ड खरेदी करण्यात आले. या सर्व वस्तू आणि किटचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.