Bhosari : सेंच्युरी एंका कंपनीत टायरमधील नायलॉन धागे बनवणा-या मशीनला आग; जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसीमधील सेंच्युरी एन्का कंपनीत भीषण आग लागली. यावेळी कंपनीत 77 कर्मचारी काम करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टायरमधील नायलॉनचे धागे बनवणारे मशीन, कंट्रोल पॅनल बोर्ड इंसुलेशन आणि दोन आयर्न प्लांट जळून खाक झाले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीमधील सेंच्युरी एन्का कंपनीत आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्र, प्राधिकरण, भोसरी, तळवडे, चिखली, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एमआयडीसी चाकण, दोन देवदूत असे एकूण 13 बंब घटनास्थळी दाखल झाले.

  • इंडस्ट्रियल आर. एन. प्लांटच्या तळमजल्यावर आग लागली होती. पहिल्या पाळीत कंपनीत एकूण 77 कर्मचारी काम करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ सर्व कामगारांना सायरन वाजवून सुरक्षित ठिकाणी येण्यास सांगितले. दोन मशीनने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने कंपनीत प्रचंड धूर झाला होता. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांना अडचण येत होती.

दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, ऋषिकांत चिपाडे, नामदेव शिंगाडे, सूर्यकांत मठपती, शांताराम काटे, फायरमन अशोक कदम, प्रतीक कांबळे, महेंद्र कोटक, मुकेश बरवे, शंकर पाटील, सुरज गवळी, रुपेश वानखेडे, विकास नाईक, दीपक साळवी, दिपक ढवळे, सोमनाथ तूकदेव, अवधूत अल्लाट, सुशील कुमार, वाहन चालक संदीप जगताप, दिनेश, अमोल खंदारे, पद्माकर बोरावके, मारुती गुजर, कनिष्ठ अभियंता जयदीप पवार, आठ फिटर असे एकूण 35 अधिकारी आणि कर्मचा-यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.