Bhosari : च-होलीत घडतोय विकासाचा नवा अध्याय – नितीन काळजे

एमपीसी न्यूज – मागील पाच वर्षात राज्य शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून च-होलीसह परिसरात पायाभूत सुविधांसह अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. या कामांमुळे च-होलीसह समाविष्ट गावांचा कायापालट होत आहे. आमदार महेश लांडगे यांचे नेतृत्व मिळाल्याने च-होलीमध्ये विकासाचा नवा अध्याय घडत आहे, असे मत माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

नितीन काळजे म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघातील चर्‍होली, मोशी, चिखली, तळवडे, दिघी ही गावे 1997 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. या समाविष्ट गावांमधील ‘चर्‍होली’ हे गाव विकासासाठी एक मॉडेल बनले आहे. चर्‍होली गेल्या 22 वर्षांपासून महापालिकेत आहे. समाविष्ट भागाने आजवर प्रामाणिकपणे केवळ कर भरण्याचे काम केले. जेवढ्या प्रमाणात कर भरला तेवढ्या प्रमाणात निधी उपलब्ध न झाल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. त्यामुळे ‘भोसरी व्हीजन-2020’च्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी चऱ्होली गावाचा कायापालट केला.

आजवर गावामध्ये विकास आराखड्यातील रस्ते झालेले नव्हते. मूलभूत सोई-सुविधाही नव्हत्या. आसपासच्या तब्बल बारा वाड्या-वस्त्या मिळून समाविष्ट गावांपैकी चर्‍होली परिसर झाला आहे. या भागाची शेतक-यांचा भाग म्हणूनच अजूनही ओळख आहे. चऱ्होलीमध्ये भूमिगत वीज वाहिन्या आणि विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याचे जाळे बनविण्यात आले आहे.

मैलाशुद्धाकरण प्रकल्पाचा दुसरा टप्पा, जलतरण तलावाचा दुसरा टप्पा साकारला जात आहे. वाघेश्वर मंदीर उद्यानाचे काम, अद्ययावत स्मशानभूमी तसेच क्रिडांगणाचे काम सुरु आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1 हजार 442 घरांची निर्मिती केली जात आहे. इंद्रायणी सुधार प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कामाला तत्काळ सुरुवात झाली आहे, असेही काळजे यांनी सांगितले.

काळजे पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे-नगर महामार्गाकडे जाणारा रस्ता चऱ्होली मधून जात आहे. भक्ती-शक्ती निगडी ते वाघोली हा रस्ता देखील चऱ्होली मधून जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चिखली, मोशी, चर्‍होली या पट्टयात सध्यस्थितीला शेकडो नवीन गृहपकल्प विकसित झाले आहेत. तसेच, तब्बल 238 गृहनिर्माण सोसायट्यांची नोंदणी आहे. या परिसराला इंद्रायणी नदीच्या किनारा लाभलेला (रिव्हर फ्रन्ट) भाग म्हणून या गावांची ओळख आहे. मध्यम व उच्चभ्रू लोकांची वस्ती या परिसरात आहे.

नितीन काळजे यांनी सांगितले की, तळेगाव, रांजणगाव आणि चाकण औद्योगिक वसाहत, पुण्यातील विमाननगर, कल्याणीनगर, तळवडे आयटी पार्क, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी महत्त्वाच्या भागांशी जोडणारा पट्टा म्हणून चिखली-मोशी-चर्‍होली ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. या भागातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सुरु केलेल्या ‘भोसरी व्हीजन-2020’ या अभियानांतील अनेक प्रकल्प या परिसरात सुरु आहेत.

महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांचा विकास नियोजनबद्ध करणे अपेक्षित होते. मात्र, तत्कालीन सत्ताधार्‍यांच्या उदासीनतेमुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होवू शकला नाही. त्यामुळे सध्यस्थितीला विकासाचा वेग पाहता आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क, अद्ययावत क्रीडा संकूल, मंजूर विकास आराखड्यातील रस्ते रुंदीकरण, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, वेस्ट टू एनर्जी, बांधकामाच्या राडारोड्यापासून पेविंग ब्लॉक निर्मीती, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प (नमामी इंद्रायणी), मैला शुद्धीकरण प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, उद्यान, क्रिडांगणे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील बहुतेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत सोयी-सुविधायुक्त असलेला प्रशस्त ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ म्हणून चिखली-मोशी-चर्‍होली या भागाची ओळख राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा ‘कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जाणार आहे. असा विश्वास नितीन काळजे यांनी व्यक्त केला.

व्हिडिओ :-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.