Bhosari : अधिकृत व्यक्तीच्या अंगठ्याच्या ठशांचे रबरी स्टॅंप अन डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅन करून करायचे आधारकार्डात बदल ; बनावट कागदपत्रे, अनधिकृतपणे आधारकार्डमध्ये बदल करणाऱ्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – रबरी स्टॅंपवर अंगठ्याचे ठसे आणि (Bhosari)डोळ्याचे फोटो स्कॅन करून आधारकार्ड मध्ये अनधिकृत बदल करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने अटक केली.

या टोळीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी दुकानातून हा प्रकार चालवला जात होता. राजस्थान राज्य शासनाच्या विविध विभागाच्या तसेच इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक राजस्थान यांच्या नावाच्या नोंदणी स्लीप या कारवाईमध्ये आढळून आल्या आहेत.

शिवराज प्रकाश चांभारे कांबळे (वय 40) आणि (Bhosari )त्याची पत्नी स्वाती चांभारे कांबळे (वय 36) हे भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या नावाने दुकान चालवत होते. त्यांच्या दुकानात इतर आरोपी धोंडीबा प्रकाश शेवाळकर (वय 24, तिघे रा. धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (वय 23, आ. आल्हाटवाडी, मोशी) हे देखील काम करत होते.

Alandi: कार्तिकी एकादशी निमित्त माऊली मंदिरात फुलसजावटीच्या कामात कामगार मग्न

आरोपींनी नागरिकांच्या आधार कार्डमध्ये बेकायदेशीरपणे बदल करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी आधारकार्डमध्ये बदल केले. दरम्यान आरोपींनी अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे नागरिकांना भासवले. याबाबत पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला माहिती मिळाली. पोलिसांनी दुकानातील हालचालींवर पाळत ठेवली.

दरम्यान, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आधार नियंत्रण समितीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी या दुकानात छापा मारून कारवाई केली.

पोलिसांना दुकानात नागरिकांनी केलेल्या आधार नोंदणीच्या स्लीप आढळल्या. त्या स्लीपवर रजिस्टर कोड, स्टेशन आयडी आणि नोंदणी एजन्सी हे राजस्थान सरकार, शालेय शिक्षण विभाग राजस्थान आणि इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक राजस्थान यांच्या नावाच्या असल्याचे समोर आले.

आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या दुकानातून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करत होते. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 420, 465, 468, 471, 473, 34, आधार कायदा 2016चे कलम 36 आणि 42 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडे पूर्वी अधिकृत आधार कार्ड केंद्र होते. मात्र या केंद्रातील अनियमिततेमुळे शासनाने हे केंद्र बंद केले होते. त्यानंतर देखील आरोपींनी त्यांच्याकडे अधिकृत आधार कार्ड केंद्र असल्याचे नागरिकांना भासवून अनधिकृतपणे हा उद्योग सुरु ठेवला.

शासनाने नेमलेल्या अधिकृत व्यक्तीचा अंगठा आणि डोळ्याचे बुबुळ स्कॅन केल्यानंतर आधार कार्डमध्ये बदल करता येतात. आरोपींनी यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी अधिकृत व्यक्तीच्या अंगठ्याच्या ठशांचे रबरी शिक्के बनवून घेतले. तसेच डोळ्यांच्या बुबुळाचे छायाचित्र स्कॅन करून ठेवले. त्या आधारे आरोपी अनधिकृतपणे नागरिकांच्या आधार कार्डमध्ये बदल करीत होते.

याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांकडून युआयडीएआय (UIDAI) ला माहिती दिली जाणार आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांना गुरुवारी (दि. 7) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 11 डिसेंबर (5 दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी वापरत असलेले अंगठ्याचे ठसे आणि डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅन कोणाचे वापरत होते. या प्रकरणात इतर लोकांचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.