Bhosari : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भोसरीत गणरायाला भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरयाचा (Bhosari) जयघोष, भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात भोसरीत सोमवारी (दि. 16) घरगुती तसेच सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करण्यात आले. प्रमुख मंडळांनी आकर्षक रथांमध्ये मिरवणुका काढल्या. अनेक मंडळांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.

अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन करण्याची भोसरीतील सार्वजनिक मंडळांची परंपरा आहे. त्यानुसार सोमवारी विसर्जन मिरवणुकांना गावठाणातील बापूजीबुवा चौकातून प्रारंभ झाला.

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील मैदानात गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने तीन हौद बांधले होते. या ठिकाणी तसेच मोशी येथे इंद्रायणी नदीघाटावर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात होते. महापालिकेच्या वतीने तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीनेही पीएमटी चौकात स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सर्वात प्रथम साडेचार वाजता संत ज्ञानेश्वर भाजी मंडई सार्वजनिक गणेश मंडळाचे आगमन झाले. ढोल ताशा पथक (Bhosari) भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत या मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मंडळाचे अध्यक्ष बोराटे यांचे स्वागत महापालिकेच्या कक्षामध्ये करण्यात आले. यावेळी उपायुक्त राजेश आगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, प्रशासनाधिकारी नाना मोरे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

त्यानंतर कानिफनाथ मित्रमंडळाचे आगमन झाले. मंडळाचे अध्यक्ष मयूर पाचारणे यांचेही स्वागत पालिकेच्या कक्षामध्ये करण्यात आले. साडेपाच नंतर खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या आगमनाला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेले रथ, आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपारिक वाद्यांचा ठेका अशा वातावरणात सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

भोसरीतील मानाचा गणपती अशी ओळख असलेल्या लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळाचे गणराय ‘त्रिशूळ’ रथामध्ये विराजमान झाले होते. रथासमोर अभेद्य पथकाने पारंपारिक वाद्यांच्या दणदणाटात सलामी दिली. लोंढे तालीम मित्र मंडळाने यंदा अयोध्यापती रथ साकारला होता. श्रीरामाची देखणी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. नाथसाहेब प्रतिष्ठानने श्रीराम रथ बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी तयार केला होता.

Nashik : धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश अशक्य; मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध

माळी आळी मित्र मंडळांच्या मिरवणुकीत भोसरीतील वीर वाद्य पथक सहभागी झाले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत 33 मंडळांनी बाप्पांना निरोप दिला. फुगे माने तालीम मंडळाचे बाप्पा सरदार आणि निनाद या ढोल ताशा पथकांची सलामी घेत विसर्जनासाठी रवाना झाले. या मंडळाने आकर्षक विद्युत रोषनाई केलेल्या रथात गणरायाला विराजमान केले होते.

नव महाराष्ट्र तरुण मंडळाचा बाप्पा आकर्षक फुलांनी सजवलेला मयूर रथात विराजमान झालेला होता. या मंडळाच्या बाप्पांसमोर आय्याप्पा मंदिर वाजंत्रीचे वादन लक्षवेधक ठरले. तसेच विघ्नहर्ता ढोल ताशा  पथक व मंगल बँडने वातावरणात वेगळाच रंग भरला. श्री गणेश मित्र मंडळाचे बाप्पा चिखलीतील मल्हार वाद्य पथकाच्या ढोल ताशाच्या तालावर वाजत गाजत आले. मंडळाचे गणराज आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या मंदिरात आरूढ झाले होते. श्रीकृष्ण तरुण मंडळाने आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली.

नरवीर तानाजी तरुण मंडळाच्या डिजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला आणि त्याच जल्लोषात बाप्पाचे विसर्जन झाले. मंडळाने विसर्जन मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विजयरथ हा देखावा साकारला होता. समस्त गव्हाणे तालीम मंडळाचे बाप्पा सुवर्णरथात आरुढ झाले होते. अष्टविनायक मित्र मंडळ व आदर्श मित्र मंडळाचे बाप्पा राम रथात विराजमान झाले होते. दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथात बाप्पा आरुढ झाले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.

पठारे लांडगे तालीम मंडळ आणि श्रीराम मित्र मंडळ यांनी यंदा एकत्रित मिरवणूक काढली. मिरवणुकीत श्रीरामरथ लक्ष वेधून घेत होता. तसेच श्रीराम ढोल ताशा पथक मिरवणुकीत सामील झाले होते. या मंडळाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा गजर लक्षवेधी ठरला.

छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने बाप्पांना गजराच्या मिरवणुकीतून भावपूर्ण निरोप दिला. या मंडळाच्या बाप्पांसमोर (Bhosari) मावळातील पथकाने मर्दानी खेळ सादर केले. या खेळांनी भाविकांचे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले.

पीएमटी चौकात भोसरी पोलीस स्टेशन तर्फे मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी उंच मनोरा उभारण्यात आला होता. पीएमटी चौकात महापालिकेतर्फे, पोलीस नियंत्रण कक्षातर्फे आणि काँग्रेस तर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत शहराध्यक्ष कैलास कदम, ओबीसी सेल अध्यक्ष सोमनाथ  शेळके, दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष जॉर्ज मॅथ्यू, ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे जय राऊत, शहाजी पाटील यांनी केले. 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share