Bhosari : बेपत्ता महिलेच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण

बारा तासाच्या आत मुलीला शोधून आणण्याचा वडिलांना दम

एमपीसी न्यूज – विवाहित महिला बेपत्ता झाल्याने पोलिसांनी गावी असणाऱ्या वृद्ध वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली. मुलीला बारा तासाच्या आत शोधून आण असे सांगून त्या वृद्ध वडिलांना पोलिसांनी ठाण्याबाहेर हाकलून काढले. हा धक्कादायक प्रकार आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारास भोसरी पोलीस ठाण्यात घडला.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरुवारी (दि. 13) एक विवाहित महिला एक वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली आहे. याबाबात सासरच्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेच्या वडिलांना याबाबत कल्पना देण्यात आली. वडिलांनी देखील सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही. रविवारी भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी महिलेच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले.

महिलेचे वृद्ध वडील पोलीस ठाण्यात आल्यानंतर देशमुख यांनी त्यांना कोणावर संशय आहे का, असे विचारले. त्यावर त्यांनी महिलेचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध असून त्याच्यासोबत गेल्याचा संशय वाटत असल्याचे सांगितले. वृद्धाने असे सांगताच देशमुख यांचा पारा चढला. त्यांनी हे आधी का सांगितलं नाही असे बोलून त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. देशमुख यांनी नातेवाइकांसमोर वृद्धाच्या कानाखाली लगावल्या. बारा तासाचा आत मला महिला आणि तिचा मुलगा इथं पाहिजे असे सांगून त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून काढले.

लग्नानंतर मुलगी बेपत्ता झाल्याने गेल्या चार दिवसापासून वृद्ध दारोदार हिंडत आहे. नातेवाईकांमध्ये देखील उलटसुलट चर्चा सुरु असल्याने वृद्ध वडिलांना अन्न गोड लागत नव्हते. महिलेचे वृद्ध वडील प्रचंड तणावाखाली असताना पोलिसांनी त्यांना अशी वागणूक दिल्याने ते पुरते ढासळले आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारातच ते धाय मोकलून रडत असल्याने भोसरी पोलिसांच्या अजब कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, “महिला मुलासह निघून गेली आहे. त्यामुळे तिच्या सासरच्यांकडून वारंवार विचारणा होत आहे. महिलेच्या वडिलांना त्यांची मुलगी पळून गेल्याचे माहिती होते. मात्र त्यांनी ही बाब पोलिसांपासून तीन दिवसांपर्यंत लपवून ठेवली. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती काढण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र पोलीस अधिका-याने वृद्धाला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय त्याची चौकशी सुरु आहे. अधिका-यांना संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पळून गेलेली महिलेच्या शोधात पथक रवाना करण्यात आले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.