Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरीकरांकडून पूरग्रस्तांना 36 गायींचे गोदान

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त नागरिकांना गोदान करण्यात आले. भोसरी येथे गायींचे विधिवत पूजन केले. त्यांनतर आमदार महेश लांडगे स्वतः सर्व गायी घेऊन सांगली, कोल्हापूरकडे रवाना झाले. पूरग्रस्तांना एकूण 100 गायी देण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात 36 गायी आणि 12 वासरे देण्यात आली. शिराळा तालुक्यात नदीच्या काठावरील गावात या गायीचे वाटप करण्यात येणार आहे. ज्या गावात सर्वात जास्त हानी झाली आहे. तसेच ज्यांच्या जगण्याचा आधार पुराने हिरावून घेतला, अशा लोकांना गायीचे वाटप करण्यात येणार आहेत.

यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली, कोल्हापूर भागात पुराचे पाणी आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपर्यंत गावागावात भरले होते. या पाण्यामुळे घरातील धान्याला मोड फुटले, कपडे कुजले, घरे जमीनदोस्त झाली आणि संसार उघड्यावर आले. पूर संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र धावला. शासनाने देखील मदत केली. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भोसरी आणि परिसरातील सहृदयी नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य असे आजवर 50 ते 60 ट्रक मदत पाठवण्यात आली आहे. ही मदत अजूनही पाठवण्यास सुरु आहे.

गरजू व्यक्तींना भाकरी देण्यापेक्षा ती भाकरी कमावण्याचे साधन देणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक, अन्नधान्य स्वरूपात मदत करण्यासोबत त्यांचा व्यवसाय, आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आपण सहकार्य करायला हवे, अशी चर्चा आमदार लांडगे यांनी त्यांच्या सहका-यांसोबत केली. त्यातून गायींचे दान करणे उत्तम असल्याचा पर्याय समोर आला. त्यानुसार आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पूरग्रस्त भागात सर्वेक्षणासाठी गेले. पथकाने सर्वेक्षण करून ज्या नागरिकांना जमीन नाही, ज्यांच्या जगण्याचे साधन पुरात गमावले आहे, अशा 100 नागरिकांची यादी बनवून त्यांना दुभत्या गायी देण्याचे निश्चित झाले आहे.

आमदार लांडगे यांनी भोसरी आणि परिसरातील नागरिकांना गायी दान करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला साद देत अनेक दानशूर हात पुढे आले. आलेल्या मदतीतून हरियाणामधून गायी आणण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बाजारभावाप्रमाणे सुमारे 80 हजार रुपये एका गायीची किंमत आहे. प्रत्येक गाय 15 लिटरच्या आसपास दूध देते. सांगली, कोल्हापूर भागातील नागरिकांचा दुग्धव्यवसाय हाच मुख्य व्यवसाय आहे. पुरामध्ये हजारो जनावरे दगावली. पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बांधवांचा व्यवसाय पुन्हा सुरु करून देणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आमदार लांडगे यांनी घेतली आहे. या भागात चितळे, गोकुळ, वारणा हे तीन मोठे दूधसंघ आहेत. त्यांच्याशी चर्चा करून इथल्या भागातील नागरिकांना गायी देण्याचा उपक्रम घेण्यात आला.

महेश लांडगे यांच्याकडून देण्यात आलेल्या गायींचे दूध इथले दूध संघ 30 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहेत. त्यामुळे लांडगे यांनी केवळ गायी न देता त्यांच्यासाठी बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली आहे. ज्या दिवशी नागरिकांना गाई मिळतील, त्याच दिवसापासून त्यांचा दुधाचा व्यवसाय पुन्हा सुरु होणार आहे. केवळ गायी न देता गायी सोबत औषधांचे दोन महिने पुरेल इतके एक किट, चारा आणि डॉक्टर देखील पाठवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.