BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : रस्त्यावर अॅसिड सांडल्याने धावपळ

एमपीसी न्यूज – रस्त्यावर अॅसिड सांडले असल्याची माहिती मिळाली आणि अग्निशमन विभागाची एकच धावपळ उडाली. भोसरी अग्निशमन विभागाने रस्त्यावर पाणी मारून अॅसिड धुवून काढले. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी पावणेएकच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे सीएनजी पंप चौकात घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी मधील सीएनजी पंप चौकात भोसरी वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करीत असताना त्यांना रस्त्यावर अचानक धूर येत असल्याचे दिसले. एखाद्या वाहनातून अॅसिड सांडले असल्याचा संशय व्यक्त करत वाहतूक पोलिसांनी भोसरी अग्निशमन विभागाला माहिती दिली. एक बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी चौकातील अॅसिड सांडल्याची जागा धुवून काढली. कोणत्या वाहनातून, कसे अॅसिड सांडले याबाबत चौकातील वाहतूक पोलिसांना देखील माहिती नाही. वेळीच उपाय केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, हे अॅसिड कोणत्या वाहनातून सांडले याचा शोध घेणे आवश्यक आहे.

HB_POST_END_FTR-A2

.