Bhosari : विधानसभा निवडणुकीत आमदार लांडगे होणार महाराष्ट्र केसरी – अभिमन्यू लांडगे (व्हिडिओ)

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना कोट्यावधी रुपयांची मदत

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत आहे. पैलवान असलेले महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. आमदार लांडगे हेच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र केसरी होतील, असा विश्वास भोसरी विधानसभेचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख अभिमन्यू (आबा) लांडगे यांनी व्यक्त केला.

अभिमन्यू लांडगे म्हणाले, “महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ची योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी तळागाळातील लोकांपर्यंत केली. त्याचा फायदा भोसरी विधानसभा मतदार संघातील रुग्णांना झाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून भोसरी विधानसभा मतदार संघातील 156 गरजु रुग्णांना तब्बल 1 कोटी 65 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ‘वायसीएम डेस्क’ स्थापन करण्यात आला आहे. या डेस्कच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली जाते. तसेच भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच मोठ्या रुग्णालयांमध्ये आमदार कार्यालय प्रतिनिधी नियुक्त केला आहे. त्यांच्याआधारे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्याला ‘डिस्चार्ज’ मिळेपर्यंत सर्व मदत केली जाते, असेही ते म्हणाले.

लांडगे पुढे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यात यावी. त्यांना रक्तदाब व मधुमेह असल्यास औषधे मोफत द्यावीत. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत ज्येष्ठांचा समावेश करावा. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे, आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाने राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलने केली होती. काही शहरांमध्ये ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन सुरू आहेत. त्यावर तक्रार केल्यास पोलीस मध्यस्थी करू शकतात. मात्र, तक्रार दाखल करू शकत नाहीत.

पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिक्षा आणि कल्याण अधिनियम 2007 या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना मासिक खर्च देण्याचे दायित्व मुलांवर असावे. तसेच, ज्येष्ठांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित रहावी. अशा तरतूदी राज्य सरकारच्या धोरणात करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली होती. त्याबाबतही भाजप सरकार सकारात्मक विचार करीत आहे. असे अभिमन्यू लांडगे यांनी सांगितले.

कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयासंदर्भात कोणतीही समस्या उद्भवू नये, याची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. रुग्णांच्या चेहर्‍यावरील समाधान हेच या संकल्पनेचे यश असल्याचे आमदार महेश लांडगे सांगतात. तसेच भोसरीतील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आगामी काळात आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचेही लांडगे सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.