Bhosari : दिघी घटनेनंतर एमआयडीसीतही लुटीचा प्रयत्न

कोयत्याचा वार झेलूनही वाचवले 10 लाख

एमपीसी न्यूज- दिघीमध्ये एका एजंटवर वार करून रोकड लंपास केल्याच्या घटनेनंतर तीन तासात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मनी एक्स्चेंज करण्यासाठी दहा लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या एकाला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र वार झेलुनही त्याने प्रतिकार केल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. बुधवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरीतील टाटा मोटर्स कंपनीजवळ हा प्रकार घडला.

मोहन अडागळे असे प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप रामभाऊ गायकवाड (वय 45, रा.वारजे) यांनी फिर्याद दिली असून तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडागळे हे त्यांच्या कार्यालयातर्फे मनी एक्स्चेंज करण्यासाठी 10 लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते. भोसरीतील टाटा मोटर्स कंपनीच्या पार्किंगसमोरून रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वार चोरटयांनी त्यांना अडवले. त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. अडागळे यांनी प्रतिकार केला असता चोरटयांनी त्यांच्या हातावर कोयत्याने वार केला. जखमी झाल्यानंतरही अडागळे यांनी बॅग सोडली नाही तसेच आरडाओरडा केला. संभाव्य धोका ओळखून चोरटयांनी पळ काढला. तसेच जाताना अडागळे यांचा मोबाईल हिसकावला. दरम्यान या घटनेच्या तीन तासांपूर्वी चार चोरटयांनी याच प्रकारे वार करून एजंटकडून एक लाखाची रक्कम हिसकावी होती. या दोन्ही घटनेतील चोरटे एकच असल्याची शक्यता असून एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.