Bhosari : गस्तीवरील पोलिसाला मारहाण; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – रात्र गस्तीवर असलेल्या एका पोलिसाला तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच ‘तू जिथे राहतो, तिथे येऊन मारील’ अशी धमकी दिली. याबाबत तरुणावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना कासारवाडी गावात बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम जवळ बुधवारी (दि. 28) रात्री एक वाजता घडली.

विलास जानकू गेंगजे (वय 26, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार अशोक दत्तात्रय ताथवडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार अशोक ताथवडे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार शिंदे हे दोघेजण कासारवाडी गावात रात्र गस्तीवर होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमला भेट देऊन तिथला क्यू आर कोड स्कॅन करत असताना आरोपी विलास दुचाकीवरून तिथे आला.

‘इथे बरीगेट का लावले आहेत’ असे विचारून फिर्यादी यांना त्याने शिवीगाळ करून हाताने कानाखाली मारली. त्यानंतर ‘तू जिथे राहतो तिथे येऊन मारील’ अशी धमकी देत फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला. त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.