Bhosari : दारू पिताना झालेल्या शाब्दिक वादातून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

Beatings over a verbal argument over alcohol; Filing a crime against each other

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या शाब्दिक वादातून मारहाणीची घटना घडली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री लांडेवाडी भोसरी येथे घडली.

बाबासाहेब अनिल म्हस्के (वय 30, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याबाबत प्रथम फिर्याद दिली. त्यानुसार दशरथ शिवाजी जगदाळे (वय 30), सोनल दशरथ जगदाळे (वय 26) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी म्हस्के, आरोपी दशरथ आणि त्यांचा मित्र काळू हे दिघेजण मेटोग्राफ कंपनीच्या समोर दारू पित बसले होते. दारू पिताना ‘तुझे आणि आपल्या परिसरातील एका महिलेचे लफडे चालू आहे, असे माझी आई मला म्हणाली’ असे फिर्यादी आरोपीला म्हणाले.

त्यावर ‘तसे असल्यास त्या मुलीनेच माझ्या नावाची तक्रार करायला पाहिजे. तुम्ही माझ्या नावाची का बदनामी करता’ असे आरोपीने फिर्यादी यांना सुनावले.

तिथे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघे आपापल्या घरी गेले. थोड्या वेळाने आरोपी दशरथ आणि त्याची पत्नी सोनल दोघेजण म्हस्के यांच्या घरी झालेल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी आले.

आरोपी दशरथ याने फिर्यादी व त्यांच्या भावाला हाताने मारहाण केली. आरोपी सोनल हिने फिर्यादी यांच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात दशरथ शिवाजी जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबासाहेब अनिल म्हस्के, राहुल अनिकेत म्हस्के, आरोपींची आई (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा आरोपी बाबासाहेब याच्यासोबत दारू पिताना किरकोळ वाद झाला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची पत्नी आरोपीच्या घरी गेले असता आरोपी बाबासाहाबे आणि राहुल या दोघांनी फिर्यादी यांना लाकडी दांडके, सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली.

आरोपींच्या आईने फिर्यादी यांच्या पत्नीला हाताने मारहाण केली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.