Bhosari: भोसरी-आळंदी रोड होणार वाहतूक कोंडीमुक्त; रस्त्याचे काम सुरु

Bhosari-Alandi road to be traffic free; Road work started

एमपीसी न्यूज – भोसरीतून आळंदी रस्त्याने प्रवास करण्यासाठी आता वाहनचालक- नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून भोसरी बायपास रोडचे काम हाती घेतले आहे. जमीन मालक आणि प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक समझोता करुन आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार रस्त्याचे काम सुरु झाले आहे.

आमदार लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये आज (सोमवारी) सकाळी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, सागर गवळी, नगरसेविका भीमाबाई फुगे, सोनाली गव्हाणे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भोसरी- आळंदी रस्ता वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर भाजी मंडई, दोन गार्डन, मंगल कार्यालये, दोन पेट्रोलपंप आहेत.

त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता होती.

आळंदी रस्ता आणि दिघी रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी (पीकअवर) मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लहान-मोठ्या अपघातांची संख्याही वाढली आहे.

दिघी अथवा आळंदीकडे जाण्यासाठी भोसरीतून समांतर रस्ता उपलब्ध नव्हता.

_MPC_DIR_MPU_II

चक्रपाणी वसाहत चौक, शास्त्री चौक, रोशन गार्डन, लांडगेनगर, फुगेवस्ती, वाळकेमळा, देवकर वस्ती या महत्त्वाच्या परिसराशी ‘कनेक्टिव्हीटी’ असलेला प्रशस्त रस्ता उपलब्ध नव्हता.

भोसरी बायपास रस्त्यामुळे वरील सर्व चौकांची कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. आळंदी तसेच, पुणे अथवा विश्रांतवाडीकडे जाण्यासाठी वाहकांचा वेळ वाचणार आहे.

अपघातही कमी होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणे अत्यावश्यक होते.

…असा आहे रस्ता!

पुणे- नाशिक महामार्गावरील सदगुरूनगरपासून ते भोसरी-आळंदीरोड वरील फुगेवस्ती- वाळकेमळा असा रस्ता आहे. हा रस्ता भोसरीच्या मुख्य चौकापासून अलीकडे (नाशिकच्या दिशेने) एक किलोमीटर अंतरावर सुरू होतो.

तसेच, आळंदी रोडवरील फुगेवस्ती- वाळकेमळा मॅगझिन चौकाजवळ संपतो. दोन किमी असलेल्या या भोसरी बायपास रस्त्यावर केवळ कार, दुचाकी, छोटी वाहने यांनाच परवानगी असणार आहे.

या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. 9 मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.