Bhosari: कोण मारणार भोसरीचे मैदान, पैलवान की वस्ताद?

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – राजकीय खेळ्या… पक्षांतर…. शेवटच्या टप्प्यात होत असलेल्या आरोप-प्रत्योरापाने गाजत चालेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. भाचेजावई विरुद्ध मामेसासरे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. भाजपचे महेश लांडगे पैलवान आहेत. तर, अपक्ष विलास लांडे यांना त्यांचे समर्थक वस्ताद म्हणतात. त्यामुळे भोसरीचे मैदान पैलवान की वस्ताद मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ म्हणून 2009 मध्ये भोसरी मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत भोसरीकरांनी अपक्ष उमेदवाराला कौल दिला आहे. त्यामुळे यावेळी देखील अपक्ष उमेदवाराच्या पदरात मतदारांचे दान पडेल, या आशेवर माजी आमदार विलास लांडे यांनी शेवटच्याक्षणी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले सत्ताधारी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारणारे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.

महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी आपल्या खंद्या समर्थकांना महापौर केले. गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावात विकासकामे करण्याचा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. सफारी पार्क, संतपीठ, वेस्ट टू एनर्जी, असे अनेक प्रकल्पांची कामे सुरू असून लवकरच ती पूर्ण होतील. मतदारसंघाबाबत भविष्याचे ‘व्हिजन’ ते मतदारांना सांगत आहेत.

महेशदादांनी शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये घेत राष्ट्रवादीला धक्का दिला. तर, 2014 चे त्यांचे काही सहकारी यावेळी त्यांच्यासोबत नाहीत ही त्यांची उणी बाजू मानली जाते. अनेक कामांमध्ये भ्रष्टाचाराचे झालेले आरोप, दादागिरीचे होत असलेले आरोप, वाहतुकीची कोंडी, रस्त्यांवर केले जाणारे अतिक्रमण, रेडझोन याबरोबर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली बेकायदा बांधकामे हे प्रश्न महेश लांडगे यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, महापौर आणि दोनवेळा आमदार अशी पदे भूषविणारे लांडे शहरातील सर्वात चाणक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. दोनवेळा भोसरीकरांनी अपक्षाला साथ दिल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. शेवटच्या क्षणी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. लांडे यांना महाआघाडीने पुरस्कृत केले तर मनसेने देखील पाठिंबा दिला आहे.

निवडणुकीच्या आखाड्यात अंतिम क्षणी उडी घेऊनही लांडे यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. प्रलंबित प्रश्न, दादागिरी, अतिक्रणाचे प्रश्न उपस्थित करत भयमुक्त भोसरीसाठी साथ देण्याचे आवाहन लांडे यांच्याकडून केले जात आहे. त्यांना भाजपचे नाराज आणि शिवसेनेच्या एका गटाची ‘छुपी’ साथ मिळण्याची देखील शक्यता असल्याची चर्चा भोसरी मतदारसंघात होत आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विलास लांडे हे कपबशी हे चिन्ह घेऊन अपक्ष लढून विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न घेता पुन्हा कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. लांडे आणि लांडगे दोघांकडूनही सोशलमीडियावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भोसरीचे मैदान चांगलेच तापले आहे. त्यामुळे भोसरीकर भाजपला साथ देतात की तिसऱ्यावेळी अपक्षाच्या बाजूने कौल देऊन इतिहास घडवितात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2014 मधील चित्र
महेश लांडगे (अपक्ष) – 60, 173
विलास लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 44, 211
एकनाथ पवार (भाजप) – 43, 626
सुलभा उबाळे (शिवसेना) 44,857

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.