Bhosari : भोसरी गोळीबारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने केला हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केला. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास गणेशनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानेश्वर रामदास लांडगे, गणेश तिम्मा धोत्रे (दोघे रा. गवळीमाथा, भोसरी), मल्लेश कोळवी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत बाळासाहेब लांडगे (30, रा. गणेशनगर, भोसरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत आणि आरोपी ज्ञानेश्वर हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात जुनी भांडणे आहेत. सकाळी अकराच्या सुमारास ज्ञानेश्वर हा साथीदारांना घेऊन प्रशांत यांच्या घरी आला. त्यावेळी आरोपींनी आपसात संगनमत करून प्रशांत यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच, ज्ञानेश्वर याने हवेत गोळीबार करीत प्रशांत यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

ज्ञानेश्वर लांडगे याच्यावर यापूर्वी काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो पाच वर्ष तो तुरुंगात देखील होता. मात्र, सर्व गुन्ह्यातून सुटल्यामुळे तो सध्या बाहेर असून यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.