Bhosari : गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना भोसरी पोलिसांकडून अटक

Bhosari police arrest absconding accused in shooting case

0

एमपीसी न्यूज – गोळीबार केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मागील एक वर्षापासून फरार होते. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोहीत नागेश गवळी (वय 30, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे), अश्पाक अब्दुलरज्जाक सय्यद (वय 31, रा. श्रमिक वसाहत, येरवडा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुमारे एक वर्षापुर्वी एक तरुण त्याच्या मैत्रीणीसोबत हॉस्पीटलवरून रात्री पावणेबाराच्या सुमारास विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी येथील घरी पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी तरुणाला व त्याच्या मैत्रिणीला थांबण्यास सांगितले. परंतु, तरुणाने आरोपींना प्रतिकार केला आणि आरोपींना ढकलुन दिले.

त्यावेळी त्यातील एका आरोपीने त्याच्याजवळ असलेले पिस्टल काढले. ‘तूझे पिस्टल खोटे आहे’ असे तरुणाने आरोपीला म्हटले. यावरून आरोपीने गोळीबार केला होता. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आशिष गोपी, गणेश हिंगे यांना सोमवारी (दि. 29) माहिती मिळाली की, गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपी अंकुशराव लांडगे नाट्यसभागृहा शेजारील मोकळ्या मैदानात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी नाट्यगृहाच्या परिसरात सापळा लावला.

त्यावेळी दोन संशयित एका मोटरसायकलवरून आले आणि नाट्यगृहाजवळ थांबले. त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते मोटार सायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी मागील वर्षभरापूर्वी गोळीबार केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप विष्णाई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, समीर रासकर, सुमीत देवकर, संतोष महाडीक, अजय डगळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like