Bhosari : लवकरच भोसरी होणार ‘स्पोर्ट्स सिटी’; आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून क्रीडा विषयक कामांची रेलचेल

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक क्रीडा विषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अनेक खेळाची मैदाने तयार करण्यासाठी निधी आणि जागांची मंजुरी मिळविण्यात आली आहे. यामुळे भोसरी परिसराला ‘स्पोर्ट्स सिटी’ अशी नवीन ओळख निर्माण होणार आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये कोणताही क्रीडा विषयक उपक्रम घेण्यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडिमवर अवलंबून रहावे लागत होते. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट अशा सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी मगर स्टेडिअमला जावे लागत असे. क्रीडा संकूल आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेण्याचे 2014 च्या निवडणुकीत भोसरीकरांना आश्वासन दिले. भोसरीकरांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर ती जबाबदारी सोपवली.

दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत असताना उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘स्पोर्टस् सिटी’ करण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी घेतला. आमदार महेश लांडगे स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना क्रीडा क्षेत्राविषयी आत्मीयता आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल साकारत आहे. भोसरीतच ओपन गॅलरी असलेले स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंडचे इंद्रायणीनगर येथे लोकार्पण करण्यात आले आहे.

जाधववाडी चिखली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीपर्पज स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. च-होली येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे. भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी संकूल, हनुमान कॉलनी गवळीनगर येथे बॅडमिंटन हॉल उभारण्यात येणार आहे. सोसायटी धारकांसाठी ओपन जिम उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

याबरोबरच अण्णासाहेब मगर स्टेडियमला गतवैभव प्राप्त करुन पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक ‘स्पोर्टस सिटी’ म्हणून करण्यासाठी देखील आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मगर स्टेडियमचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

तसेच, याठिकाणी ‘स्पोर्टस युनिव्हर्सिटी’ साकारण्याचा आमदार महेश लांडगे यांचा मानस आहे. प्रामुख्याने भोसरी विधानसभा मतदार संघातील त्या-त्या प्रभागात अद्ययावत क्रीडांगण उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे प्रयत्न सुरु आहेत.

फूटबॉलपटू आकाश कोळेकर म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी खेळाची मैदाने तयार होत आहेत. काही मैदाने तयार झाली असून त्याचा खेळाडू वापर करीत आहेत. यापूर्वी आम्हाला क्रीडा उपक्रम घेण्यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडीयमवर अवलंबून राहावे लागत होते. पण आमदार महेश लांडगे यांनी ज्या-त्या प्रभागात क्रीडा मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ही मैदाने तयार झाल्यास भोसरी विधानसभा मतदारसंघातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील. पिंपरी-चिंचवड आणि भोसरीला स्पोर्ट्स सिटी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी सर्व खेळाडू परिश्रम घेतील.”

क्रीडा क्षेत्रातील वसंत लोंढे म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भोसरी परिसरातून अनेक खेळाडू जिल्हा, राज्य पातळीवर पाठवले आहेत. त्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. महेश लांडगे स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी खेळाला प्राधान्य दिले आहे. कुस्ती, कबड्डी, हॉलीबॉलची मैदाने तयार होत आहेत. 15 कोटी रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र तयार केले जात आहे. यामुळे कुस्तीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल. अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मल्ल भोसरी परिसरात तयार होतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like