Bhosari : डॉ. अमोल कोल्हे यांना पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड

राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची बाईक रॅली

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज (रविवारी) भोसरी मतदारसंघात बाईक रॅली काढण्यात येत आहे. नागरिकांमध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांची ‘क्रेझ’ दिसून येत असून त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

या रॅलीत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना लोंढे, भोसरीतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले आहेत. टीव्ही वरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे. मालिकाविश्वासह त्यांनी राजकारणात देखील उडी घेतली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरु आहे.

शिरुर मतदारसंघात येणा-या भोसरी परिसरात डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाईक रॅली काढण्यात येत आहे. संपूर्ण भोसरी मतदारसंघातून ही रॅली काढण्यात येत आहे. यामध्ये उमेदवार डॉ. अमोल कोल्हे देखील सहभागी झाले आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत मुख्य भूमिकेमुळे त्यांची नागरिकांमध्ये ‘क्रेझ’ दिसून येत आहे. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.