Bhosari : भाजपची वाढती ताकद ; खासदार निवडून आल्याने राष्ट्रवादीतही उत्साह

शिवसेनेचाही मतदारसंघावर दावा

आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. मतदारसंघातून कुणासमोर कुणाचे कडवे आव्हान असणार आहे, कोणाला ही निवडणूक सोपी जाईल याच्या चर्चाना वेग आला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विचार करायचा झाल्यास शहराच्या तीनही विधानसभा मतदार संघात कुणाचे वर्चस्व आहे ? कोण कुणाला वरचढ ठरू शकेल ? कोणत्या पक्षाची स्थिती बिकट आहे ? याचा लेखाजोखा मांडणारी मालिका.

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती भोसरीतीलच आहेत. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उत्साह संचारला आहे. त्यातच शिवसेनेने देखील मतदारसंघावर दावा केला आहे. भोसरीत भाजप-राष्ट्रवादी की शिवसेना-राष्ट्रवादीत सामना होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून यंदा भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मात्र रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

भोसरी मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आल्यापासून भोसरीकरांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. पहिले अपक्ष आमदार होण्याचा मान विलास लांडे यांना मिळाला. तर, दुसरा मान महेश लांडगे यांना मिळाला. लांडगे सध्या विद्यमान आमदार आहेत. भोसरी विधानसभेची येणारी तिसरी निवडणूक होत आहे. महेश लांडगे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असून महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे. लांडगे आणि सभागृह नेते एकनाथ पवार यांच्यात भाजपच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने 2014 मध्ये स्थायी समिती सभापती असलेल्या महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. 60 हजार 173 मते घेत 15 हजार 316 मताच्या फरकाने ते निवडून आले. शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी दुस-या क्रमाकांची 44 हजार 857 मते घेतली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांना 44 हजार 211, भाजपचे एकनाथ पवार यांना 43 हजार 626, काँग्रेसचे हनुमंतराव भोसले यांना 14 हजार 363 आणि मनसेचे सचिन चिखले यांनी 4 हजार 231 मते मिळविली होती.

आता भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. मतदारसंघात शिवसेनेची 40 हजार मते हक्काची असल्याचा त्यांचा दावा आहे. तर, दुसरीकडे भाजपचे सहयोगी सदस्य असलेले महेश लांडगे यांनी भाजपची उमेदवारी निश्चित असल्याचे गृहित धरत निवडणुकीची मागील दोन वर्षांपासूनच तयारी सुरु केली आहे. भाजपचे जुने, निष्ठावान कार्यकर्ते आणि महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी देखील उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरु असून त्यांच्या दिल्ली, मुंबईच्या वा-या वाढल्या आहेत. पवार हे मराठवाड्यामधील आहेत.  मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन भोसरीमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यांचा पाठिंबा एकनाथ पवार यांना मिळू शकतो. तसेच एकनाथ पवार हे कामगार क्षेत्रातून उदयाला आलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे कामगारवर्ग देखील त्यांच्या मागे उभा राहू शकतो.

शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा विधानसभेला सलग दोनवेळा पराभव झाला आहे. तर, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत देखील त्यांना पराभव सोसावा लागला. त्यातच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी शिवसेनेकडून लढण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या वाढदिवासानिमित्त त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ‘भोसरीचा गड शिवसेना राखणारच असा नारा’ देत भोसरीतील प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.  त्यांच्या पाठीशी कामगार वर्ग मोठा असून तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ आहे. शहरातील राजकारणातील ‘फ्रेश’ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु, भोसरीत शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही. खासदारांचा देखील पराभव झाला आहे. आमदार लांडगे भाजपचे सहयोगी सदस्य असल्याने शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता धूसर आहे. मात्र, ऐनवेळी राजकारणात काहीही होऊ शकते, या आशेवर सय्यद आहेत.

लोकसभेला शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे निवडून आले असले. तरी, भोसरीतून त्यांना 88 हजार 259 मते मिळाली; मात्र मताधिक्य मिळाले नाही. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी भोसरीतून 1 लाख 25 हजार 336 मते मिळविली होती. 37 हजार 77 मतांचे मताधिक्य होते. महेश लांडगे आता भाजपसोबत आहेत. भाजपची ताकद वाढली आहे. मागच्या निवडणुकीतील लांडगे, उबाळे आणि पवार यांची मते विचारात घेता युतीची दीड लाखाच्या आसपास मते निश्चित मानली जात आहेत. त्यामुळे भोसरीत युतीचे पारडे जड मानले जात असून मतदारसंघ शिवसेनेला की भाजपला सुटते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपकडून महेश लांडगे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदारसंघात त्यांची ताकद वाढली आहे. युवा वर्गासह महिला, ज्येष्ठांचा लांडगे यांना पाठिंबा वाढत आहे. भोसरीत भाजपचे 32 नगरसेवक असून एक अपक्ष नगरसेविकाही भाजपसोबतच आहे. महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती ही महापालिकेतील महत्वाची पदे देखील भोसरीतीच आहेत. समाविष्ट गावात विकासकामे केल्याने लांडगे यांच्यामागे गावातील नागरिकांची सहानुभुती आहे. त्याचा निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो. तर, गेल्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या काही सहका-यांनी त्यांची साथ सोडली आहे. तसेच सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याशी त्यांचे पटत नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत कुरबुरींचा त्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह

तर, विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये शिरुरमधून खासदार निवडून आला असल्याने उत्साह निर्माण झाला आहे. मताधिक्य मिळाले नसले. तरी, विरोधकांचे मते कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. परंतु, अभिनेते असलेल्या डॉ. कोल्हे यांची ‘क्रेझ’ असल्याने मते वाढल्याचे सांगत भाजपकडून राष्ट्रवादीचा दावा खोडला जात आहे.

भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 नगरसेवक आहेत. ब-यापैकी पक्षाची ताकद आहे. नेहरुनगर परिसरात वर्चस्व असलेले माजी महापौर हनुमंत भोसले, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले आता राष्ट्रवादीमध्ये आहेत. पक्षापासून दुरावलेले जुने लोक, मागील निवडणुकीत वेगळी भूमिका घेतलेले पदाधिकारी पुन्हा पक्षाकडे येत आहेत. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी नगरसेवक पंडित गवळी हे इच्छुक आहेत. या तिघांपैंकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागील दोन पंचवार्षिकपासून एकाला उमेदवारी दिल्यावर दुस-याने बंडखोरी करण्याची आणि बंडखोराला साथ देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जणूकाही परंपराच निर्माण झाली आहे. यंदा ती मोडित निघाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण करु शकेल.

….तर एकनाथ पवार, सुलभ उबाळे कोणती भूमिका घेणार ?

गेल्यावेळी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून दुस-या क्रमांकाची मते मिळविलेल्या सुलभा उबाळे, 43 हजार मते घेतलेले भाजपचे एकनाथ पवार उमेदवारी न मिळाल्यास कोणती भूमिका घेतात हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे. यंदा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील भोसरीत असणार आहे. वंचित आघाडीला मानणारा मतदार भोसरीत मोठ्या संख्येने आहे. ती मते कोणाकडे झुकतात? यावर भोसरीतील आमदार कोण होईल हे ठरणार आहे; मात्र त्याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला जास्त बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.