Bhosari Blast News: अंघोळ घालताना चिमुकलीच्या अंगावर पडले उकळते ऑईल; पाच महिन्यांच्या चिमुकलीसह आजीचा उपचारादरम्यान मृत्यू, आई गंभीर

एमपीसी न्यूज – पाच महिन्यांच्या चिमुकलीला घराबाहेरच्या अंगणात अंघोळ घालत असताना अचानक विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. यामध्ये उकळते ऑईल अंगावर पडल्याने पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजी गंभीररित्या भाजल्या गेल्या. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी दीडच्या सुमारास इंद्रायणीनगर येथे घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा आणि तिच्या आजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आई गंभीर जखमी असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवानी सचिन काकडे (वय 5 महिने) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर शिवानीची आई हर्षदा सचिन काकडे (वय 32) यांच्यावर उपचार सुरु आहेत.

इंद्रायणीनगर परिसरातील राजवाडा भागात बिल्डींग क्रमांक तीन जवळ महावितरण कडून विद्युत रोहित्र बसवण्यात आले आहे. त्या रोहित्राच्या शेजारी एका पत्र्याच्या घरात दिलीप कोतवाल कुटुंब राहत आहे. कोतवाल यांच्या घरी त्यांची मुलगी माहेरपणासाठी आली होती. शनिवारी दुपारी घरासमोरील अंगणात कोतवाल आजी त्यांच्या मुलीसह आपल्या नातीला अंघोळ घालत होत्या.

अंघोळ घालत असताना घराशेजारी असलेल्या विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. रोहित्रामधून उकळते ऑईल बाहेर उडाले. हे उकळते ऑईल मयत शारदा, शिवानी आणि जखमी हर्षदा यांच्या अंगावर पडले. यामध्ये तिघी गंभीररीत्या भाजल्या. ही घटना घडली, त्यावेळी दिलीप कोतवाल आणि त्यांचा मुलगा घरी नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शिवानीला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात तर दोन्ही महिलांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळ शिवानीला देखील तिच्या आई आणि आजीसोबत ससून रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असताना शनिवारी रात्री शारदा आणि शिवानी यांचा मृत्यू झाला. हर्षदा देखील 80-90 टक्के भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्फोट झालेले विद्युत रोहित्र तिथून दुसरीकडे नेऊन बसवावे, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

नगरसेविका नम्रता लोंढे म्हणाल्या, “शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान राजवाडा येथील बिल्डींग क्रमांक तीन जवळ असलेल्या विद्युत रोहीत्राला आग लागली होती. अग्निशमन विभागाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर विद्युत रोहित्र बदलण्याची मागणी केल्याने महावितरणने आग लागलेला विद्युत रोहित्र नेले आणि दुसरे आणून बसवले.”

दुसरे आणून बसवलेले रोहित्र देखील जुनेच होते. हे रोहित्र शनिवारी सकाळी पाच वाजता सुरु करण्यात आले. शनिवारी दुपारी बसवलेल्या दुस-या रोहित्राचा स्फोट झाला आणि दुर्दैवी घटना घडली. राजवाडा परिसरातील काही भाग दोन दिवसांपासून अंधारात आहे. एका परिवारावर मोठे संकट कोसळले आहे, असेही नगरसेविका लोंढे म्हणाल्या.

एमआयडीसी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले, “राजवाडा येथील विद्युत रोहित्राच्या स्फोट प्रकरणात दोघींचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी हजर आहेत. रविवारी (दि. 6) सकाळी नऊपर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.