Bhosari Crime News : भोसरी, चाकणमध्ये चार चोरीच्या घटनांमध्ये सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चोरीच्या घटना घडल्या. या चार घटनांमध्ये दोन लाख 25 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी (दि. 21) चाकण आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अतुल पंढरीनाथ दौंडकर (वय 37, रा. इंद्रायणीनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश बबन मुने (वय 24, रा. पाथर्डी, ता. जि. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकेश याने फिर्यादी यांच्या घरात डुप्लिकेट चवीच्या साहाय्याने कुलूप उघडून प्रवेश केला. घरातून 15 हजारांची सोन्याची चेन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आणखी एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. संभाजी रावसाहेब खिस्से (वय 23, रा. गवळीमाथा, भोसरी) यांनी अनोळखी चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे रूम पार्टनर खोलीत झोपलेले असताना अनोळखी चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून 22 हजारांचे दोन मोबाईल फोन चोरून नेले.

सागर श्रीधर गोपाळे (वय 28, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई. मूळ रा. आडगाव, पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून 38 हजार 300 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, गॅस सिलेंडर चोरून नेला.

चाकण पोलीस ठाण्यात आणखी एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. राजेंद्र गोपू राठोड (वय 24, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दीड लाख रुपये किमतीची रिक्षा फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.