Bhosari : मदतीसाठी पोलिसांना संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची आयुक्तांकडे तक्रार

Complaining to the commissioner that no response was received even after contacting the police for help

संचारबंदीत पुणे-मुंबई महामार्गावर मध्यरात्री चार तासात पाडले घर

एमपीसी न्यूज – संचारबंदी लागू असताना मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत सुमारे 50 जणांच्या समूहाने घर पाडले. घरात राहणा-या भाडेकरूने मदतीसाठी पोलिसांशी संपर्क केला. मात्र, पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत भाडेकरू नागरिकाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

आशुतोष चंद्रभान यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे की, रात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजण्याच्या कालावधीत सुमारे 50 लोकांच्या समूहाने एकत्र येऊन भाड्याने राहत असलेले घर पाडले.

हा प्रकार सुरु असताना यादव यांनी तीन वेळेला पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला फोन केला. मात्र, पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर फिर्याद घेण्यात आली आहे. या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील यादव यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

काय आहे प्रकरण –

घरमालकाच्या दोन नातवांनी जेसीबीच्या साहाय्याने जागेत राहत असलेल्या भाडेकरूचे घर पाडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर सामान असा एकूण 9 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची फिर्याद भाडेकरूने दिली आहे.

ही घटना गुरुवारी (दि. 4) रात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शंकरवाडी, कासारवाडी येथे घडली.

आशुतोष चंद्रभान यादव (वय 27, रा. शंकरवाडी, कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, निलेश अंकुश लांडे (वय 28), अमोल अंकुश लांडे (वय 25, दोघे रा. कासारवाडी) आणि त्यांचे 25 ते 30 पुरुष आणि 15 ते 20 महिला साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यादव हे लांडे यांच्या जागेत भाडेतत्वावर राहत आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा ते पहाटे पाच या कालावधीत आरोपी हे यादव राहत असलेल्या घरी आले.

यादव यांची पत्नी, मुलगी, भाऊ यांना घराच्या बाहेर जाण्यास सांगून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड, फिर्यादी राहत असेलेले घर तोडून घरातील साहित्य, भंगारच्या दुकानातील मटेरियल तोडले.

त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, कागदपत्रे आणि इतर साहित्य टेम्पोमध्ये भरून नेले.

आरोपींनी तांबे, पितळ, शोल्डर पाटा, लोखंडी चहाची टपरी असे 6 लाख 9 हजार रुपयांचे सामान आणि 3 लाख 68 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असे एकूण 9 लाख 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस काय म्हणाले –

याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे म्हणाले, यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्यांनी तक्रारीत सुमारे पावणे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे सांगितले आहे. पण यादव यांच्याकडून त्या मालाच्या पावत्या सादर केल्या नाहीत. सात वर्षांपासून जागा मालकाला भाडे दिल्याची देखील कुठेही नोंद नाही.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून यादव राहत असलेल्या लांडे यांच्या जागेतील बांधकाम अनधिकृत असून ते काढून घेण्यासाठी नोटीस देण्यात आली.

त्या नोटीसला लांडे यांनी उत्तर देत अनधिकृत बांधकाम काढून घेतो असे सांगितले.

अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी लांडे यांनी जेसीबीच्या साहाय्याने यादव राहत असलेले घर पाडले आहे. यात मारहाण किंवा प्रतिकार करण्याचा प्रकार कुठेही झाला नाही.

यादव यांच्या घरातील साहित्य , दागिने आरोपींनी चोरून नेल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार फिर्याद घेतली आहे.

चोरीला गेलेल्या मालाच्या पावत्या यादव यांनी दिल्या नसल्याने न्यायालयाकडून देखील याबाबत विचारणा केली जात आहे. याबाबत योग्य न्याय दिला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.