Bhosari : दापोडी दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारासह संबंधित अधिका-यांवरही गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दापोडी येथे ड्रेनेज लाईनमध्ये मातीच्या ढिगा-यात अडकून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बचावासाठी गेलेल्या एका अग्निशमन विभागाच्या जवानाचा समावेश होता. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी साडेपाच ते सोमवारी पहाटे साडेतीन या कालावधीत दापोडी पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी ठेकेदारासह महापालिकेच्या संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मालक एम बी पाटील, सब कॉन्ट्रॅक्टर अशोक माणिकराव पिल्ले, सब कॉन्ट्रॅक्टर सुनील रमेश शिंदे, सुपरवायझर धनंजय सुधारक सगट यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कल्याणी पिरप्पा जमादार (वय 56, रा. ओमकार वस्ती, फुगेवाडी. मूळ रा. कर्नाटक) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागेश कल्याणी जमादार (वय 22) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मे. पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम घेतले होते. रविवारी सुट्टी असल्याने काम बंद होते. मात्र, पाईपलाईनसाठी खोदकाम करत असताना आरोपींनी सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी न घेता कामगाराला काम करण्यासाठी ड्रेनेजच्या लाईनमध्ये उतरवले. तसेच आरोपींनी सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता काम करून घेतले. दरम्यान, वरून पडलेल्या मातीच्या ढिगा-यात अडकून मजुराचा मृत्यू झाला. याबाबत ठेकेदारासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे तपास करीत आहेत.

काय आहे दापोडी दुर्घटना प्रकरण ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मागील दोन दिवसांपासून ड्रेनेजचे काम सुरु आहे. नागेश जमादार हा कामगार ते काम घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करत होता. त्याला रविवारी (दि. 1) सुट्टी होती. तरीही संबंधितांनी त्याला कामावर आणले. सायंकाळी सहाच्या दरम्यान तो ड्रेनेजच्या खड्ड्यात काम करत असताना अचानक वरून खड्ड्यात माती पडली आणि त्यात तो गाडला गेला. त्याला वाचविण्यासाठी सीताराम सुरवसे आणि ईश्वर बडगे हे दोन तरुण गेले. त्याला बाहेर काढत असताना आणखी माती पडली आणि तिघेजण गाडले गेले.

याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे कैलास वाघेरे, दिलीप गायकवाड, निखिल गोगावले, सरोज फुंडे, मुकेश बर्वे आणि विशाज जाधव या सहा जणांना घेऊन वाहनचालक गवारी यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विशाल जाधव, निखिल गोगावले, सरोज फुंडे हे जवान अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. जवानांनी सीताराम आणि ईश्वर या दोघांना सुखरूप बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जमादार यांची माहिती एक नागरिक अग्निशामक दलाच्या जवानांना देत होता. त्यांना बाहेर काढत असताना बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे वरच्या ढिगा-यातून आणखी माती खाली ढासळली आणि नागेश आणि अग्निशमन विभागाचे तीन कर्मचारी पुन्हा गाडले गेले.

त्यापैकी फुंडे आणि गोगावले हे तोंडापर्यंत दबले गेले. त्यामुळे त्यांना श्‍वास घेता येत होता. तर, विशाल यांच्या मानेवर मोठा दगड पडून मातीचा ढिगारा अंगावर पडला. अग्निशमन विभागाच्या तीन जवनांसह चारजण पुन्हा अडकले. याबाबतची माहिती वाहनचालक गवारी यांनी अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला दिली. अग्निशामक दलाचे जवान दबल्याची माहिती मिळताच उर्वरित सर्व उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यास सुरवात केली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर गोगावले व फुंडे यांची सुखरूप सुटका केली. तर अडीच तासाने विशाल जाधव यांना शोधण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अग्निशामक दलाच्या मदतीला एनडीआरएफ आणि लष्कराची एक तुकडी दाखल झाली. तसेच अग्निशमन विभागाच्या पुण्यातील देखील काही पथकांना बोलावण्यात आले. रात्री अग्निशमन विभागासह एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. घटनास्थळी सेफ झोन तयार करून पथकाने शोधमोहीम सुरू केली. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाल जमादार यांचा शोध लागला. मात्र, ढिगा-यात अडकून त्यांचा देखील मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.