Bhosari : किरकोळ कारणावरून मारहाणप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा; सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या एकूण सहा जणांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी पाचच्या सुमारास शांतिनगर, भोसरी येथे घडली.

फैय्याज सत्तार अन्सारी (वय 31), मुस्तफा सत्तार अन्सारी (वय 38), इजहार सत्तार अन्सारी (वय 28, सर्व रा. शांतिनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्यासह नूरजहा अन्सारी (वय 35) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रंगनाथ गोविंद पवार (वय 42) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंगनाथ यांचा पुतण्या सुनील (वय 22) याचे बसण्याच्या कारणावरून आरोपी फैय्याज याच्यासोबत भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी रंगनाथ आणि त्यांच्या पत्नी गेल्या. त्यावेळी आरोपी फैय्याज, मुस्तफा आणि इजहार या तिघांनी लाकडी बांबूने रंगनाथ यांना मारहाण केली. यामध्ये रंगनाथ यांच्या हातावर आणि पायावर गंभीर दुखापत झाली.

रंगनाथ यांना शिवीगाळ करत ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशी आरोपींनी धमकी दिली. रंगनाथ यांच्या पत्नीला आरोपी नुरजहा हिने जोरात ढकलून दिले. त्यामुळे रंगनाथ यांच्या पत्नीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात फय्याज सत्तार अन्सारी (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रंगनाथ गोविंद पवार (वय 42), रामदास गोविंद पवार (वय 50), सचिन रामदास पवार (वय 28), संगीता रंगनाथ पवार (वय 35) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील रंगनाथ, रामदास आणि सचिन या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी बाहेर बसल्याच्या कारणावरून त्यांच्या सोबत वाद केला. तसेच फिर्यादी यांचा भाऊ मुस्तफा अन्सारी यांच्या डोक्यात दगडाने मारून तसेच बहीण नूरजहा हिच्या कमरेवर लोखंडी पाईपने मारून जखमी केले.

आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. असे सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.