Bhosari : वाढदिवसाच्या दिवशी फटाके वाजवणाऱ्या बर्थडेबॉयला न्यायालयाने ठोठावला 500 रुपये दंड

एमपीसी न्यूज- आपल्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री मित्रांसमवेत फटाके फोडून रहिवाशांची झोपमोड करणाऱ्या बर्थडेबॉयला कायद्याचा चांगलाच बडगा बसला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाने त्याला 500 रुपयांचा दंड केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.

सागर बाळशीराम पराड (वय 20, रा. द्वारका सोसायटी, मोशी) असे दंड ठोठावलेल्या बर्थडेबॉयचे नाव आहे.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरचा 1 जून रोजी वाढदिवस होता. या दिवशी मध्यरात्री त्याने मित्रांसोबत फटाके वाजवले आणि मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. फटाक्यांच्या आवाजाचा मोठा त्रास झाल्याची तक्रार शेजारी राहणाऱ्या नागरिकांना केली होती.

या तक्रारीनुसार भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सागर याला ताब्यात घेतले होते. सागरवर मुंबई पोलीस कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला.

दरम्यान, तलवारीने केक कापणाऱ्या अनेक बर्थडेबॉईजवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याचा आसुरी आनंद घेणाऱ्या तरुणांना यामुळे नक्कीच चाप बसेल अशा प्रतिक्रिया सामान्यांकडून व्यक्त होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.