Bhosari Crime : कोऱ्या चेकने खातेदाराची 65 लाखांची फसवणूक; एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सही केलेला कोरा चेक घेऊन बँकेतील व्यवस्थापक आणि तत्सम अधिकाऱ्यांनी खातेदाराच्या खात्यातून परस्पर दोघांच्या खात्यावर 65 लाखांची रक्कम ट्रान्स्फर केली. याबाबत खातेदाराने विचारणा केली असता खातेदाराला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ट्रान्स्फर केलेले पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत एसबीआय बँकेचे व्यवस्थापक आणि त्याच्या चार साथीदारांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिताब श्रीवास्तव (वय 48, रा. एम्पायर स्क्वेअर, चिंचवड), संजय शेवाडे (रा. सांताक्रुज ईस्ट, मुंबई), ए एस मुखर्जी, मी प्रतिभा कृषी प्रकिया ली. चे डायरेक्टर सतीश चव्हाण आणि अश्विनी सतीश चव्हाण (दोघे रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत धनेश वसंतराव माळी (वय 34, रा. बाणेर रोड, औंध) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 26 फेब्रुवारी 2019 रोजी कासारवाडी येथील एसबीआय बँकेच्या शाखेत घडला आहे. याबाबत 3 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी माळी यांचे एसबीआय बँकेत लोन अकाऊंट आहे. आरोपी महिताब, संजय आणि मुखर्जी हे बँकेमध्ये व्यवस्थापक आणि तत्सम पदावर कार्यरत होते. त्यावेळी आरोपींनी माळी यांच्याकडून कर्जाच्या सिक्युरिटीसाठी आणखी एक कोरा चेक सही करून देण्यास सांगितले. माळी यांनी त्यानुसार कोरा चेक दिला. तो चेक भरून आरोपींनी 65 लाख रुपयांची रक्कम आरोपी सतीश आणि अश्विनी यांच्या खात्यात ट्रान्स्फर केली. याबाबत माळी यांनी विचारणा केली असता दोन दिवसांसाठी ही रक्कम ट्रान्स्फर केली असून दोन दिवसानंतर पैसे पुन्हा खात्यात येतील, असे माळी यांना सांगण्यात आले.
दोन दिवसात रक्कम खात्यात जमा न झाल्याने ते पुन्हा बँकेत विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच माळी यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.