Bhosari : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भीमराव देशमुख यांच्यासह त्यांच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) विकास देशमुख यांचे मेहुणे सुधीर विठ्ठलराव भवर (वय ३९, रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे.

  • एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीआय देशमुख यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. १६ मे २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सुधीर त्यांच्या बहिणीला घेऊन सासरी सोडण्यासाठी आले. देशमुख हे भोसरीमधील अधिकारी निवास पोलिस लाईन येथे राहतात. त्यावेळी देशमुख यांनी सुधीर यांना शिवीगाळ केली.

तसेच सुधीर यांच्या बहिणीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारले. यामध्ये सुधीर यांची बहिण गंभीर जखमी झाली. याबाबत सुधीर यांनी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

  • हट्टा पोलीस ठाण्यातून हा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांची बहीण अद्याप एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आले नाहीत. त्यांचा जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.