Bhosari Crime : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची 8 कोटी 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेकडे तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीची बनावट कागदपत्रे तयार करून पती-पत्नीने मिळून बँकेची तब्बल 8 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च 2015 पासून मार्च 2017 या कालावधीत जी. एस. महानगर को. ऑप लिमिटेड भोसरी शाखा या बँकेत घडली.

बाबासाहेब बाळासाहेब जासूद (वय 49), हेमलता बाबासाहेब जासूद (वय 42, दोघे रा. विमाननगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत बबन घमाजी सोमवंशी (वय 51, रा. च-होली. मूळ रा. खारघर) यांनी मंगळवारी (दि. 25) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जी. एस. महानगर को. ऑप लिमिटेड बँकेच्या भोसरी शाखेतून आरोपींनी कर्ज घेतले आहे. कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीवर कोणताही बोजा, हक्क, कब्जा नाही. तसेच त्या प्रॉपर्टीवर कोणत्याही न्यायालयात दावा दाखल नाही, असे खोटे शपथपत्र, घोषणापत्र, बंधपत्र आणि कर्ज करार करून दिला.

त्याआधारे जासूद दांपत्याने मार्च 2015 मध्ये पाच कोटी, मार्च 2016 मध्ये 2 कोटी आणि मार्च 2017 मध्ये एक कोटी 15 लाख रुपयांचे असे एकूण 8 कोटी 15 लाखांचे कर्ज घेतले. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.