Bhosari Crime : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मोशी येथील अनधिकृत बांधकाम महापालिकेने नोटीस देऊनही  काढलेले नाही. याबाबत चार जणांवर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडी मशीन रोड मोशी येथील दोन बांधकामांबाबत आणि भोसरी मधील एका बांधकामाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

दर्शन राजमल बाफना, कविता अनिल गायकवाड (दोघे रा. खडी मशीन रोड, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपअभियंता हेमंत प्रभाकर देसाई (वय 47) यांनी याबाबत बुधवारी (दि. 25) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाफना यांनी 12 ऑक्टोबर रोजी विनापरवाना अनधिकृत बांधकाम केले. त्याबाबत पालिकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळून देखील बाफना यांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही.

तसेच गायकवाड यांनी देखील विनापरवाना अनाधिकृत बांधकाम केले. त्याबाबत पालिकेने गायकवाड यांनाही नोटीस बजावली होती. नियमानुसार अनधिकृत बांधकाम काढून टाकणे बंधनकारक असतानाही गायकवाड यांनी बांधकाम काढले नाही. याबाबत महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सागर दत्तात्रय काटे, कमल दत्तात्रय काटे (रा. महादेव आळी, दापोडी गावठाण) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपअभियंता राजेंद्र वसंतराव डुंबरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी अनधिकृत बांधकाम केले. त्याबाबत पालिकेने त्यांना नोटीसही बजावली. त्याचे पालन न करता आरोपींनी अनधिकृत बांधकाम हटवले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.