Bhosari Crime : भोसरी परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबईल पळवण्याच्या चार घटना

एमपीसी न्यूज – वाहनचोरी नंतर आता जबरदस्तीने मोबईल फोन, सोनसाखळी हिसाकावण्याच्या घटना देखील वाढत आहेत. रविवारी (दि. 20) एकाच दिवशी भोसरी पोलीस ठाण्यात तीन तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एक जबरदस्तीने मोबईल फोन पळवल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत शिवदास सुनील वाघ (वय 21, रा. भोसरी) यांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि. 19) पहाटे पावणे सहा वाजता फिर्यादी वाघ भोसरी येथील हॉटेल वनराज येथून पायी चालत कामावर जात होते. त्यावेळी तीन अनोळखी चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी वाघ यांच्या हातातील चार हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

दुस-या घटनेत निलेश शिवराम चव्हाण (वय 36, रा. काळेवाडी, पाचपीर चौक, पिंपरी) यांनी चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि. 18) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी चव्हाण गुडविल चौक, कासारवाडी येथून कामावरून घरी जात होते. त्यावेळी दोन दुचाकींवर चार चोरटे आले. त्यातील एका दुचाकीवरील मागे बसलेल्या चोरट्याने चव्हाण यांचा दहा हजारांचा मोबईल फोन तर दुस-या दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने चव्हाण यांच्या खिशातून 20 हजारांची रोख रक्कम चोरून नेली.

तिसऱ्या घटनेत किरण बाळासाहेब शिरवाळे (वय 21, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 15 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजता फिर्यादी शिरवाळे कामावर पायी चालत जात होते. ते लांडेवाडी येथील अॅम्फेनॉल इंटरकनेक्ट इंडिया या कंपनीच्या गेट समोर आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील दहा हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

चौथ्या घटनेत विवेकांनद सनमुख अप्पा स्वामी (वय 29, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोपान अशोक कोरडे, प्रवीण अशोक कोरडे (दोघे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 20) सायंकाळी सात वाजता फिर्यादी स्वामी यांनी एमआयडीसी भोसरी येथील इंद्रायणी स्वीट होम समोर त्यांची दुचाकी पार्क केली. त्यावेळी आरोपींनी विनाकारण स्वामी यांना धक्का देऊन त्यांची दुचाकी पाडली. त्यानंतर स्वामी यांना शिवीगाळ करून हाताने व लोखंडी स्पॅनरने मारहाण केली.

त्यावेळी फिर्यादी स्वामी घाबरून पळून जाऊ लागले. आरोपींनी स्वामी यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची साखळी आणि तीन हजारांचा एक मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.