Bhosari Crime – महापालिकेच्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत आढळला मानवी सांगाडा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बालाजीनगर येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळला. हा प्रकार आज (मंगळवारी, दि. 17) सकाळी उघडकीस आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर, भोसरी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. शौचालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी बाजूलाच एक टाकी बांधण्यात आली आहे. त्या टाकीत मागील काही दिवसांपूर्वी मासे सोडण्यात आले होते. ते मासे काढून टाकीची स्वच्छता करण्यासाठी आज दोघेजण त्या टाकीत उतरले.

टाकीची स्वच्छता सुरू असताना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला. याबाबत नागरिकांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून सांगाड्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

आढळलेल्या हाडांचा सांगाडा कुणाचा याचा शोध पोलीस घेत आहेत. खून केल्यानंतर हाडे पिशवीत घालून टाकली की नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीची हाडे टाकली याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.