Bhosari Crime : पिंपरी-चिंचवड शहरात मोबईल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहराला सुरक्षित आणि भयमुक्त ठेवण्याचे आश्वासन दिले. मात्र, कृष्ण प्रकाश यांच्या पदभार स्विकारण्यानंतर शहरात जबरी चो-यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मागील दोन आठवड्यात दररोज जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. शनिवारी (दि. 26) भोसरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे तब्बल चार तर भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येक एक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रस्त्याने पायी चालत जात असलेल्या नागरिकांना टार्गेट बनवून चोरटे त्या नागरिकांचा पाठलाग करतात आणि पायी चालत जाणा-या व्यक्तीने मोबईल फोन खिशातून काढताच हे चोरटे डाव साधतात. मोबईल फोनवर बोलताना, फोन लावताना किंवा चालताना एकांत ठिकाणी गाठून हे चोरटे जबरदस्तीने मोबईल फोन चोरून नेत आहेत.

शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात सतीश शिवाजी जाधव (वय 29, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव 19 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता कंपनीत कामावर जाण्यासाठी घरातून निघाले. चक्रपाणी वसाहतीत नंदनवन कॉलनी येथे आले असता त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करण्यासाठी मोबईल फोन खिशातून काढला.

त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने जाधव यांच्या हातातून त्यांचा पाच हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. जाधव यांना कंपनीतून सुट्टी मिळत नसल्याने त्यांनी सात दिवसानंतर याबाबत गुन्हा नोंदवला आहे.

जबरी चोरीच्या दुस-या घटनेत संजयकुमार नीलकंठ पाटील (वय 33, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजता कंपनीत कामावर जाण्यासाठी घरातून निघाले. धावडे वस्ती, भोसरी येथे कंपनीच्या बसची वाट पाहत थांबले असताना त्यांनी मोबईलमधील अपडेट पाहण्यासाठी त्यांचा मोबईल खिशातून काढला. मोबईलमध्ये पाहत असताना दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा पाच हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. पाटील त्यानंतर लॉकडाऊन असल्याने त्यांच्या कर्नाटक येथील गावी गेले होते. गावाहून आल्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा नोंदवला आहे.

तिस-या घटनेत रुखसार हाजीमलंग सारवाण (वय 20, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सारवाण 22 जून रोजी रात्री नऊ वाजता त्यांच्या मित्राची दुचाकी आणण्यासाठी दापोडी येथून फुगेवाडीच्या दिशेने पायी चालत जात होते. चालत जात असताना ते फोनवर बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांचा 11 हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

आशितोष प्रदीप परांडे (वय 19), अभिषेक मुकुंद बारटक्के (वय 20), मतिन जुबेर शेख (वय 18, तिघे रा. दापोडी) अशी सारवाण यांचा मोबईल फोन चोरणा-यांची नावे आहेत. या तिन्ही चोरट्यांना सांगवी पोलिसांनी एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

चौथ्या घटनेत तेजस जालिंदर तेलंग (वय 20, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी तेलंग 15 सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपासमोर त्यांनी मोबईल पाहण्यासाठी हातात घेतला. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांनी तेलंग यांच्या हातातून सहा हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

फिर्यादी तेलंग देखील कर्नाटक राज्यातील असून ते मधल्या काळात त्यांच्या गावी गेले होते. गावाहून आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

पाचव्या प्रकरणात प्रथमेश दत्तात्रय चोळके (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चोळके 24 सप्टेंबर रोजी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर जवळ रस्त्यावर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन अनोळखी चोरटे आले. त्यांनी चोळके यांना शिवीगाळ व मारहाण केली आणि त्यांच्याकडील दोन मोबईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 15 हजार 700 रुपयांचा ऐवज खिशातून काढून चोरून नेला.

सहाव्या प्रकरणात रंगनाथ रामचंद्र तरंगे (वय 57, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरंगे 6 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे पाच वाजता कामावर जात होते. पिंपळे गुरव येथील तुकाई मंदिराजवळ आले असता मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 16 हजारांचा मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. सांगवी पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. आशितोष प्रदीप परांडे (वय 19), अभिषेक मुकुंद बारटक्के (वय 20), मतिन जुबेर शेख (वय 18, तिघे रा. दापोडी) अशी या चोरट्यांची नावे आहेत. याच चोरट्यांनी दापोडी येथे देखील एक मोबईल फोन चोरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.