Bhosari Crime News : भोसरी एमआयडीसी परिसरात दोन महिलांचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातून 63 हजारांचे, तर संत नगर, स्पाईन रोड येथे कुटुंबासोबत घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांचे गंठण चोरट्यांनी चोरून नेले.

या दोन्ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री सव्वानऊ ते पावणे दहा या कालावधीत घडल्या आहेत.

पहिल्या घटनेत राजेंद्र किसन पवार (वय 44, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांच्या पत्नी त्यांच्या भावाला भेटून पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून घरी जात होत्या. रात्री सव्वानऊच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील 63 हजार 497 रुपयांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले.

दुस-या घटनेत पूजा संतोष शिंदे (वय 33, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे त्यांचे पती आणि मुलांसोबत मंगळवारी रात्री स्पाईन सिटी मॉल येथे नाष्टा करण्यासाठी आले होते.

नाष्टा केल्यानंतर घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी शिंदे यांच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.