Bhosari : पूर्ववैमनस्यातून भर रस्त्यात दहशत पसरवून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून भर रस्त्यात दहशत पसरवून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सव्वाआठच्या सुमारास सखुबाई गार्डन समोर आळंदी रोड भोसरी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन सवडकर, ऋषी वानखेडे (दोघे रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी), मयूर मडके अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गोविंदा विलास कोळी (वय 22, रा. च-होली फाटा, आळंदी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंदा रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सखुबाई गार्डन समोर आळंदी रोडवर नाष्टा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडके दाखवत आरडा ओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली. आसपासच्या नागरिकांना शिवीगाळ केली. यामुळे परिसरातील हातगाडीवाले हातगाडी बंद करून पळून गेले.

आरोपींच्या दहशतीला घाबरून गोविंदा देखील पळून जाऊ लागले. आरोपींनी गोविंदा यांच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये गोविंदा जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.