Bhosari Crime News : कोविड सेंटरमध्ये दारू न मिळाल्याने कोरोना बाधिताचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – दारूच्या आहारी गेलेल्या एका कोरोना बाधित व्यक्तीला कोविड सेंटरमध्ये दारू न मिळाल्याने त्याने कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालून पाण्याच्या रिकाम्या टाकीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही घटना गुरुवारी (दि. 29) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास बाल नगरी भोसरी येथील कोविड सेंटरमध्ये घडली.

हरीश गायकवाड (वय 36, रा. दिघी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रुग्णाचे नाव आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी हरीश कोरोना बाधित झाला. त्यामुळे त्याला बालनगरी, भोसरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याला दारूचे व्यसन आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याला तिथे दारू मिळाली नाही.

दारू प्यायला न मिळाल्याने तो अस्वस्थ झाला. तेथील कर्मचाऱ्यांशी त्याने वाद घातला. त्यानंतरही त्यास दारू मिळाली नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या हरीश याने पाण्याच्या रिकाम्या टाकीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.