Bhosari Crime News : लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या 18 जणांवर गुन्हा

13 वाहनांसह 9 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात सर्व आस्थापना बंद असताना दोन दारू दुकानदार त्यांच्या दुकानातून काही व्यक्तींना दारू विकण्यासाठी दारूसाठा देत होते. या टोळीवर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली असून 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी 11 दुचाकी, एक तीनचाकी आणि एक चारचाकी अशी 13 वाहने आणि मद्यासाठा असा एकूण 9 लाख 82 हजार 720 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

रोहित रविंद्र तिडेकर (वय 22, रा. भाटनगर, पिंपरी, पुणे) इतर 15 जण आणि भाग्यश्री वाईन्स, कुणाल वाईन्सचे चालक-मालक यांच्या विरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ) (ई) 82, 83 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी परिसरात असलेल्या भाग्यश्री वाईन्स व कुणाल वाईन्सचे चालक-मालक हे त्यांचे वाईन शॉपमधून देशी दारू आणि बिअरच्या बाटल्या काही व्यक्तींना विकत असून हे विकत घेणारे व्यक्ती पुढे नागरिकांना विकत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला बुधवारी (दि. 12) मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी भोसरी एमआयडीसी मधील इंद्रायणी कॉर्नर येथे नाकाबंदी लावून काही वाहनांची अचानक तपासणी केली. त्यामध्ये पोलिसांना एक लाख 15 हजार 50 रुपयांच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या, 17 हजार 670 रुपये रोख रक्कम, आठ लाख 50 हजारांच्या 11 दुचाकी, एक तीनचाकी आणि एक चारचाकी अशी 13 वाहने आढळून आली.

पोलिसांनी नऊ लाख 82 हजार 720 रुपयांचा ऐवज जप्त केला. नाकाबंदी दरम्यान आढळलेले दारू वाहून नेणा-या वाहन चालकांनी भाग्यश्री वाईन्स व कुणाल वाईन्स या दुकानातून खरेदी करण्यासाठी दारू चालवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, दत्तात्रय गोरे, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.