Bhosari Crime News : बर्फाच्या गोळ्यावर रंग कमी टाकला म्हणून गोळा विक्रेत्याला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – बर्फाच्या गोळ्यावर रंग कमी टाकल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून बर्फ गोळा विकणा-यास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच विक्रेत्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली. या प्रकारात आरोपींनी तीन वाहनांचे देखील नुकसान केले.

हा प्रकार गुरुवारी (दि. 18) सकाळी साडेअकरा वाजता शांतीनगर, भोसरी येथे घडला.

सब्रेआलम उर्फ सलमान नईम शाह (वय 33, रा. इंद्रायणी चाळ, भोसरी) असे मारहाण झालेल्या गोळा विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत महेश विजय उफाडे, कृष्णा विजय उफाडे, नाम्या लक्ष्मण डोनगाऊ, राकेश (सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाह हे बर्फाचा गोळा विक्रीचा व्यवसाय करतात. ते गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शांतीनगर गल्ली नंबर तीन येथे गोळा विकत होते. त्यांनी एका लहान मुलाला गोळा विकला. त्यावर रंग का कमी टाकला अशी आरोपींनी फिर्यादी यांना विचारणा केली.

त्यानंतर लाकडी दांडके आणून फिर्यादी यांच्या खिशातील एक हजार 200 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. त्यांची हातगाडी तोडून बाटल्या फोडून नुकसान केले. तसेच परिसरातील तीन वाहनांचे देखील नुकसान केले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.