Bhosari crime News : श्वानाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शहरात श्वानांवरील हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सांगवीमध्ये दोन, देहूरोड येथे एक आणि त्यापाठोपाठ आता भोसरी येथे एक घटना घडली आहे. भोसरी येथे लांडगेनगर भागात एका श्वानाला अमानुषपणे मारहाण करून त्याला रिक्षात घालून नेल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीता उत्तम पंडित (वय 33, रा. संतनगर, मोशी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंडित यांची मैत्रीण आरती सोनार यांच्या पाहण्यात असलेल्या एका श्वानाला एका अनोळखी रिक्षा चालकाने गळ्यात दोरी बांधून जोरजोरात ओढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात तो श्वान जखमी झाला.

ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी साडेदहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर लांडगेनगर, भोसरी येथे घडली. त्यानंतर रिक्षा चालकाने श्वानाला रिक्षात घालून अज्ञात ठिकाणी नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत अनोळखी रिक्षा चालकाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 428, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम 11 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.