Bhosari Crime News : भोसरी,चाकण, हिंजवडी, वाकड मध्ये पाच चोरीच्या घटना; तीन लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी, चाकण, हिंजवडी आणि वाकड येथे चोरीच्या पाच घटना घडल्या आहेत. यामध्ये दोन लाख 91 हजार 313 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 25) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात रवींद्र राघवन नायर (वय 60, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. 23 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा ते 24 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हायटेक मेटल प्रोसेसर या कंपनीत भिंतीवरून उडी मारून प्रवेश केला. कंपनीतून कॉपर प्लेट, फ्लॅट बार, झिंक इगॉट असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच वेस्टर्न हिट अँड फोर्ज कंपनी मध्ये देखील चोरटयांनी भितीवरून उडी मारून प्रवेश केला. कंपनीमधून 59 हजार 813 रुपयांचे पार्ट चोरट्यांनी चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात किरण दादाराव आंबेकर (वय 31, रा. तळेगाव चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. 23 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या घराच्या अर्धवट उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप व मोबाईल फोन असा 23 हजरांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात राजेंद्रकुमार डुंगरवाल (वय 31, रा. महाळुंगे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने एक लाख दोन हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार 25 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात प्रशांत अरुण धुळधुळे (वय 27, रा. बावधन बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची कार घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत फिर्यादी यांच्या कार मधील सीएनजीचे ईसीएम व इंजेक्टर, सीएनजी असे २१ हजारांचे पार्ट चोरून नेले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात अविनाश बाबुराव ठोंबरे (वय 24, रा. संभाजीनगर जकातनाका दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी 3 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांची इको कार रहाटणी येथील एका हॉस्पिटल शेजारी पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचा 15 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरून नेला. हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.