Bhosari crime News: सहाय्यक आयुक्तांनी भोसरी परिसरातील सेक्स रॅकेटचे मोडले कंबरडे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर छापे मारून कारवाई केली जात आहे. पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या तीन लॉजवर पोलिसांनी छापे मारून तब्बल आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

तीन लॉजवर केलेल्या कारवायांबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. भोसरी मधील धावडे वस्ती येथे साईराज लॉजवर छापा टाकला. त्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

शास्त्री चौकातील सूर्या हॉटेल अँड लॉजवर दुसरा छापा टाकला. यात पोलिसांनी तिघांना अटक केली. तिसरा छापा शास्त्री चौकातील वनराज हॉटेल बार रेस्टोरंट व लॉजिंग या लॉजवर टाकला. त्यात तिघांना अटक करण्यात आली.

पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलिसांनी ही मोहीम राबवण्यात आली. डॉ. कवडे यांनी वेश्या व्यवसाय चालणा-या हॉटेल आणि लॉजेसची माहिती काढून त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

त्यानुसार पोलिसांनी खबरे पेरून माहिती काढली आणि एकाच दिवशी तीन लॉजवर छापे टाकले. यामुळे बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

तरुणी, महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जातो. वेश्या व्यवसाय करवून घेत त्यातील पैशांवर हे आरोपी आपला उदरनिर्वाह चालवत होते. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 343, 370, 370 (अ), 188, 34, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956चे कलम 3, 4, 5, 6, 7 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. मटका, जुगार अड्डे, दारू अड्डे, पत्त्यांचे क्लब, दारूभट्ट्या, बेकायदेशीरपणे रस्त्यावर, हॉटेलमध्ये दारू विकणे अशा प्रकारांना पोलिसांनी आळा घातला आहे.

भोसरी परिसरातील सेक्स रॅकेटवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे या गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. अवैध धंदे करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पळता भुई थोडी केली आहे. अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी पोलीस करत असलेल्या कारवायांबाबत पिंपरी चिंचवडकर समाधान व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.