Bhosari Crime News : सोशल मीडियावरील फेक अकाउंटद्वारे तरुणीसह तिच्या नातेवाईकांना अश्लील मेसेज
एमपीसी न्यूज – तरुणीच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे तरुणीची बदनामी केली. तसेच तरुणीच्या भावाचेही बनावट अकाउंट तयार करून त्यावरही तरुणीबाबत अश्लील मेसेज व पोस्ट केल्या. तरुणीच्या वडिलांना अश्लील फोटो पाठवून तरुणीची बदनामी केली. याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्कर्ष साळुंके (वय 21, रा. कवठे पिराण, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 28 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 16 डिसेंबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उत्कर्ष याने पीडित तरुणीच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर अश्लील मेसेज पाठवले. त्यानंतर तरुणीच्या फोटोचा वापर करून बनावट अकाउंट तयार केले. त्यावर अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्या.
त्यानंतर तरुणीच्या भावाच्या फोटोचा वापर करून त्याचेही बनावट अकाउंट तयार केले. त्यावरही असभ्य पोस्ट टाकून भावाच्या पत्नीच्या नावाने मेसेज करून त्रास दिला. तरुणीच्या वडिलांना व्हाट्सअपवर बदनामी कारक मेसेज केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.