Bhosari Crime News : ‘त्या’ एटीएम चोरी प्रकरणात देखभाल, सुरक्षेची जबाबदारी असणारे होणार सहआरोपी

एमपीसी न्यूज – पांजरपोळ भोसरी येथील एसबीआयचे एटीएम एका टोळीने फोडून नेले. एटीएमची देखभाल आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी असलेल्या संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे एटीएमची देखभाल आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी असलेल्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.

पांजरपोळ येथील एसबीआयचे एटीएम फोडून नेणाऱ्या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 लाख 33 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

एटीएम फोडणाऱ्या टोळीने गुन्हा करण्यापूर्वी भोसरी परिसरातील एटीएमची पाहणी केली होती. त्यामध्ये पांजरपोळ येथील एटीएम मध्ये सायरन, तसेच सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांनी हेरले. तसेच हे एटीएम निर्मनुष्य ठिकाणी असल्याने त्यांनी हे एटीएम फोडण्याचा निर्णय घेतला. 10 जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी हे एटीएम फोडून नेले. यामध्ये चोरट्यांनी पैशांच्या चार ट्रे सह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड चोरून नेली.

हा प्रकार घडल्यानंतर एटीएम मधील सायरन वाजला नाही. तसेच एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमला नाही. हा संबंधितांचा हलगर्जीपणा आहे. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याने एटीएमच्या तांत्रिक बाबी आणि सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. एटीएम फोडीच्या या गुन्ह्यात संबंधितांना सहआरोपी करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.