Bhosari crime News : डंपरची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शुक्रवारी, दि. 27) दुपारी पाच वाजताच्या सुमारास घडला आहे.

सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर स्वप्नील बंगले असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सनी आणि स्वप्नील भोसरीकडून पिंपळे सौदागरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. कासारवाडी येथील नाशिक फाटा जवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. त्यात सनीचा जागीच मृत्यू झाला, तर स्वप्नील गंभीर जखमी झाला.

प्रत्यक्षदर्शी महादेव कदम म्हणाले, “मी माझ्या कामासाठी नाशिक फाट्याकडून पिंपळे सौदागरच्या दिशेने जात होतो. नाशिक फाट्याजवळ हा अपघात पाहिला आणि थांबलो. पोलिसांच्या मदतीसाठी 100, 198 या क्रमांकावर वारंवार फोन केले.

मात्र, फोन उचललाच नाही. बराच वेळ पोलीस मदतीच्या प्रतीक्षेत थांबल्यानंतर दोन-तीन नागरिकांच्या मदतीने जखमी स्वप्नीलला माझ्या कारमधून पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.”

भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे म्हणाले, “नाशिक फाट्याजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना घटनास्थळी पाठवले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.”

अडचणीत असताना पोलिसांच्या मदतीची आवश्यकता असते. मात्र, नेमकं अडचणीच्या वेळी पोलीस साधा फोनही उचलत नाहीत. तात्काळ मदत मिळणे तर फार दूरची गोष्ट आहे. जखमी तरुणाला पोलिसांच्या मदतीसाठी बराच वेळ रस्त्यावर पडून राहावं लागलं ही दुर्दैवी बाब आहे.

शेवटी नागरिकांनी पुढाकार घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.