Bhosari crime News : ट्रक चालकच निघाला चोर; लपवून ठेवलेले 160 टायर जप्त

चालक चोरट्याने लपवून ठेवलेले 160 टायर पोलिसांनी जप्त करत आरोपीला अटक केली आहे.

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सात लाख 61 हजार 162 रुपये किमतीचे 160 टायर चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 2) रात्री एक ते पहाटे चार वाजताच्या सुमारास राजमाता उड्डाणपुलाजवळ भोसरी येथे घडली. यामध्ये ट्रक चालकच चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. चालक चोरट्याने लपवून ठेवलेले 160 टायर पोलिसांनी जप्त करत आरोपीला अटक केली आहे.

सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. चिंबळी फाटा. मूळ रा. तिरुपटेलवाडी, ता. निलंगा, जि. लातूर ) असे अटक केलेल्या ट्रक चालक आरोपीचे नाव आहे. प्रदीप सोमदत्त शर्मा (वय 34, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांच्या कंटेनरवर (एमएच 12 / एचडी 5793) आरोपी सुरेश चालक म्हणून काम करतो.

ट्रान्सपोर्टचे मालक अनमोल सतीश वायचळ यांच्या मार्फत बुधवारी चाकण येथील ब्रिस्टोन इंडिया प्रा. लि. या कंपनीमधून कंटेनरमध्ये 14 लाख 37 हजार 564 रुपये किमतीचे 421 टायर लोड केले.

हे टायर अंधेरी मुंबई येथे पोहोच करायचे होते. आरोपी चालकाने टायर मुंबई येथे पोहोच न करता भोसरी येथे कंटेनर थांबवून 160 टायर चोरी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई बाळासाहेब विधाते यांना माहिती मिळाली की, ट्रक चालक सुरेश यानेच ट्रक मधील टायर चोरले आहेत. त्याने चोरी केलेले टायर आपटे कॉलनी, भोसरी येथे एका खोलीत लपवून ठेवले आहेत.

पोलिसांनी सुरेश याला स्पाईन रोड मोशी येथील ओंकार लॉज मधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरलेल्या टायर बाबत चौकशी केली असता त्याने टायर चोरल्याचे कबुली दिली.

पोलिसांनी चोरी केलेले सात लाख 61 हजार 162 रुपये किमतीचे 160 टायर जप्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.